प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलमध्ये ‘येल्लो डे’ चा सोहळा दिमाखात;
लहानग्यांच्या आनंदाने उजळली शाळा

साक्री : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलमध्ये ‘येल्लो डे’ अत्यंत उत्साहपूर्ण व आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला. लहानग्यांना रंगांची ओळख करून देणे, पिवळ्या रंगाचे महत्त्व समजावून सांगणे तसेच त्यांच्या सर्जनशीलतेला चालना देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
या दिवशी संपूर्ण शाळा परिसर पिवळ्या फुलांनी, फुग्यांनी व आकर्षक सजावटीने उजळून निघाला होता. विद्यार्थ्यांनी पिवळ्या रंगाची वेशभूषा परिधान करून उत्स्फूर्त सहभाग घेतला. विविध गाणी, कविता, कृतीप्रधान उपक्रम व मनोरंजक खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी पिवळ्या रंगाशी संबंधित संकल्पना आनंदाने आत्मसात केल्या. लहानग्यांच्या निरागस हास्याने आणि उत्साहाने कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
या प्रसंगी शाळेचे संस्थापक आदरणीय श्री. प्रशांत भीमराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत अशा उपक्रमांमुळे बालवयातच आत्मविश्वास, आनंदी वृत्ती व सर्जनशीलता विकसित होते, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी प्राचार्या सौ. वैशाली लाडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच समन्वयक श्री. तुषार देवरे व श्री. वैभव सोनवणे यांनीही मार्गदर्शन करून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.
सौ. पूजा जोहरी यांनी कार्यक्रम संयोजक म्हणून उत्कृष्टरित्या कामगिरी सांभाळली. सूत्रसंचालन सौ ज्योती नांद्रे यांनी केले. सजावटीची जबाबदारी श्री. पियुष बागुल व श्रीमती दिपमाला अहिरराव यांनी समर्थपणे पार पाडली. विविध उपक्रमांचे आयोजन सौ. सुनिता पाटील यांनी केले. छायाचित्रण व व्हिडिओ चित्रिकरण श्रीमती नम्रता गोसावी व श्रीमती अश्विनी ठाकरे यांनी केले. कविता सादरीकरण श्रीमती सविता लाडे यांनी केले. फलक लेखनाची जबाबदारी सौ. प्रभावती चौधरी व सौ. पूजा जोहरी यांनी सांभाळली. मनोगत श्रीमती प्रियंका पवार यांनी व्यक्त केले.
‘येल्लो डे’ मुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह, सकारात्मकता व रंगांविषयीची जाणीव अधिक दृढ झाली असून कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.















