पिंपळनेर : प्रचिती पब्लिक स्कूल, पिंपळनेर येथे संस्थेचे चेअरमन मा. श्री. प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्रोत्सव नऊ दिवस भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
या नऊ दिवसांत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. दररोज एका विद्यार्थिनीने दुर्गामातेच्या नऊ रूपांपैकी एका रूपाची वेशभूषा साकारली. यामध्ये माँ शैलपुत्री, माँ ब्रह्मचारिणी, माँ चंद्रघंटा, माँ कूष्मांडा, माँ स्कंदमाता, माँ कात्यायनी, माँ कालरात्री, माँ महागौरी आणि माँ सिद्धिदात्री या नऊ रूपांचे दर्शन घडविण्यात आले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या छोटेखानी नृत्यप्रस्तुतींमुळे कार्यक्रमात विशेष रंगत निर्माण झाली.
शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता पाटील आणि समन्वयक श्री. राहुल अहिरे यांच्या हस्ते देवींचे पूजन करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर भाषणे देऊन नवरात्रोत्सवाचे महत्त्व विशद केले. तसेच दररोज शिक्षकांनी संबंधित देवीच्या रूपाची माहिती, तिचे महत्त्व आणि त्यामागील पौराणिक संदर्भ विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
तसेच नवरात्रोत्सवानिमित्त शाळेत कन्या पूजनाचा कार्यक्रमही भक्तिभावाने पार पडला. या उपक्रमातून कन्येतील देवीस्वरूपाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती, परंपरा आणि देवीच्या नऊ रूपांचे महत्त्व जाणून घेण्याची संधी मिळाली. संपूर्ण नवरात्रोत्सव यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि सर्वांच्या सहकार्यामुळे नवरात्रोत्सव आनंददायी, सांस्कृतिक व भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला.

























