संविधान दिनानिमित्त प्रचिती इंटरनॅशनल स्कूल, कावठे येथे विविध उपक्रमांचे आयोजन!
भारतीय संविधानातील लोकशाही मूल्यांची जाणीव विद्यार्थ्यांच्या मनात रुजावी तसेच न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचा आदर विद्यार्थ्यांनी आपल्या आचरणातून करावा, या उद्देशाने प्रचिती इंटरनॅशनल स्कूल, कावठे येथे गुरुवार, दिनांक २६ नोव्हेंबर २०२६ रोजी संविधान दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व, नागरिकांचे मूलभूत हक्क व कर्तव्ये, लोकशाही व्यवस्था, राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक समानता यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी संविधान दिनानिमित्त भाषणे सादर करून संविधानातील मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले.
या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री. प्रशांत भीमराव पाटील, प्रचिती इंटरनॅशनल स्कूलच्या उपप्राचार्या सौ. नीतू पंजाबी, प्राचार्या समन्वयक श्री. तुषार देवरे व श्री. वैभव सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले.
आदरणीय चेअरमन साहेबांनी विद्यार्थ्यांनी संविधानातील मूल्ये केवळ पुस्तकापुरती मर्यादित न ठेवता ती आपल्या दैनंदिन जीवनात आत्मसात करावीत आणि एक जबाबदार नागरिक म्हणून देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असा संदेश दिला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा कार्यक्रम प्रेरणादायी व ज्ञानवर्धक ठरला.
संविधानाचा सन्मान, लोकशाहीचा अभिमान आणि कर्तव्यांची जाणीव हाच सुजाण नागरिकत्वाचा खरा पाया आहे, हा मोलाचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

















