प्रचिती इंटरनॅशनल स्कूलच्या कावठे, साक्री व कासारे या तिन्ही शाखांमध्ये दीपावलीचा सण आनंद, उत्साह आणि सामाजिक जाणीवेचा सुंदर मिलाफ साधत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
दिवाळी म्हणजे केवळ दिव्यांची रोषणाई नसून दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश निर्माण करण्याचा सण आहे, ही उदात्त भावना जपत शाळेचे आदरणीय संस्थापक तथा चेअरमन श्री. प्रशांत भीमराव पाटील यांनी एक अनोखा सामाजिक उपक्रम राबविला. या उपक्रमांतर्गत गरजू व वंचित घटकांतील बांधवांना नवीन कपडे तसेच दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. समाजातील प्रत्येक घटकाला सणाचा आनंद अनुभवता यावा आणि त्यांच्या चेहऱ्यावरही आनंद फुलावा, या भावनेतून राबविण्यात आलेला हा उपक्रम खऱ्या अर्थाने माणुसकीचा दीप प्रज्वलित करणारा ठरला. याप्रसंगी आदरणीय चेअरमन श्री. प्रशांत भीमराव पाटील यांनी सर्वांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
दिवाळी उत्सवानिमित्त शाळेचा संपूर्ण परिसर झेंडूच्या फुलांनी आकर्षकपणे सजविण्यात आला होता. विविध रंगांच्या मनमोहक रांगोळ्यांनी शाळेच्या प्रांगणाला विशेष शोभा प्राप्त झाली. विद्यार्थ्यांसाठी आकाशकंदील बनविण्याची स्पर्धा तसेच पणत्या सजविण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून आणि कलाकौशल्यातून एकापेक्षा एक सुंदर आकाशकंदील व आकर्षक पणत्या साकारल्या.
या उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे दिवाळीच्या पाचही दिवसांचे महत्त्व सांगणारे देखावे! धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज या प्रत्येक दिवसाचे धार्मिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. पाचही दिवसांचे देखावे अत्यंत कल्पकतेने व आकर्षक पद्धतीने साकारण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती आणि परंपरांची प्रत्यक्ष अनुभूती मिळाली.
उत्सवात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या बहुरंगी नृत्याविष्कारांनी आणि आकर्षक नृत्य सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली. तसेच दिवाळीच्या परंपरा, संस्कृती आणि सामाजिक संदेश अधोरेखित करणाऱ्या लघुनाटिका व नाट्यप्रयोगांनी कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त करून दिली. विद्यार्थ्यांच्या अभिनयकौशल्यातून आणि संवादफेकीतून सणांचे महत्त्व, संस्कार व सामाजिक संदेश प्रभावीपणे मांडण्यात आले. पारंपरिक वेशभूषा, नृत्य, नाट्य आणि सांस्कृतिक सादरीकरण यांमुळे संपूर्ण शाळा परिसर दिवाळीच्या आनंदात न्हाऊन निघाला.
या संपूर्ण उपक्रमाला आदरणीय संस्थापक तथा चेअरमन श्री. प्रशांत भीमराव पाटील यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन लाभले. तसेच प्राचार्या सौ. वैशाली लाडे, समन्वयक श्री. तुषार देवरे व श्री. वैभव सोनवणे, तिन्ही शाखांचे प्राचार्य, शाखाप्रमुख, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि ड्रायव्हर बंधू यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सर्वांच्या एकत्रित नियोजनातून आणि परिश्रमातून हा दीपोत्सव अविस्मरणीय ठरला.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ, संस्कृतीचे संस्कार, नृत्य-नाट्याचा कलाविष्कार, समाजातील वंचित घटकांच्या जीवनात आनंदाची पेरणी आणि माणुसकीचा संदेश देणारा प्रचिती स्कूलचा हा दीपोत्सव खऱ्या अर्थाने प्रकाशपर्व ठरला!
दिव्यांची आरास, संस्कारांचा वारसा अन् माणुसकीचा प्रकाश… प्रचितीच्या दीपोत्सवाने जिंकली सर्वांची मने!
![]()


















