साक्री : प्रचिती इंटरनॅशनल स्कूलच्या कावठे, साक्री व कासारी या तिन्ही शाखांतील विद्यार्थ्यांचा एकदिवसीय अभ्यासदौरा नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. दैनंदिन शालेय अभ्यासाच्या चौकटीबाहेर विद्यार्थ्यांना आनंद, अनुभव आणि प्रत्यक्ष निरीक्षणाची संधी मिळावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या सहलीत विद्यार्थ्यांनी दहिवेल येथील यात्रेला भेट देत आकाशपाळण्यांचा मनमुराद आनंद लुटला.
यात्रेतील विविध आकर्षणे, रंगीबेरंगी दुकाने, खेळणी आणि मनोरंजनाची साधने पाहताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. विशेषतः आकाशपाळण्यांमध्ये बसून विद्यार्थ्यांनी घेतलेला थरारक अनुभव आणि मित्रमैत्रिणींसोबत केलेली मजा-मस्ती हा सहलीचा विशेष आकर्षणबिंदू ठरला. हसत-खेळत, गप्पा मारत आणि आनंदाचे क्षण अनुभवत विद्यार्थ्यांनी या एकदिवसीय सहलीचा मनसोक्त आनंद घेतला.
या अभ्यासदौऱ्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ मनोरंजनच नव्हे, तर प्रत्यक्ष अनुभवातून निरीक्षण, सामाजिक वातावरणाची ओळख, समूहभावना, शिस्त आणि सहकार्याचे महत्त्व समजून घेण्याची संधी मिळाली. त्यामुळे ही सहल विद्यार्थ्यांसाठी आनंदासोबतच अविस्मरणीय अनुभव देणारी ठरली.
या संपूर्ण उपक्रमाचे आयोजन प्रचिती इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक व चेअरमन आदरणीय श्री. प्रशांत भीमराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तसेच मुख्याध्यापिका सौ. वैशाली लाडे, समन्वयक श्री. तुषार देवरे व श्री. वैभव सोनवणे यांच्या नियोजनातून सहल यशस्वीरीत्या पार पडली. तिन्ही शाखांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सहकाऱ्यांनी, ड्रायव्हर बंधू व मावशी यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची आणि शिस्तीची काळजी घेत सहलीचे नियोजन सुरळीतपणे पूर्ण केले.
अभ्यास, अनुभव आणि आनंद यांची सुंदर सांगड घालत विद्यार्थ्यांच्या स्मरणात कायम राहील असा हा एकदिवसीय अभ्यासदौरा प्रचिती परिवारासाठी आनंदाचा अविस्मरणीय दिवस ठरला.
























