कावठे साक्री कासारे : गणरायाच्या मंगलमय आगमनाने सुरू झालेला भक्तीचा सोहळा, अकरा दिवसांची अखंड आराधना, विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने सजलेले विविध उपक्रम आणि अखेरीस *‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’*च्या जयघोषात भरलेल्या मनांनी झालेला निरोप, अशा भावपूर्ण वातावरणात प्रचिती इंटरनॅशनल स्कूलच्या साक्री, कावठे व कासारे या तिन्ही शाखांमध्ये गणेशोत्सव उत्साहात व भक्तिभावाने साजरा करण्यात आला.
गणेशोत्सवाच्या प्रारंभी तिन्ही शाखांमध्ये श्री गणेशाची विधिवत प्रतिष्ठापना करून गणरायाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर तब्बल अकरा दिवस शाळेचा परिसर गणरायाच्या नामस्मरणाने आणि भक्तीमय वातावरणाने भारून गेला. दररोज वेगवेगळ्या वर्गांना बाप्पाच्या आरतीचा मान देण्यात आला. विद्यार्थ्यांनी सामूहिकरीत्या आरती करत गणरायाला विविध प्रकारचे नैवेद्य, फळे, फुले अर्पण करून मनोभावे सेवा केली. या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ धार्मिक परंपरेची ओळखच नव्हे, तर शिस्त, सेवाभाव, सामूहिक सहभाग आणि संस्कारांची शिकवण मिळाली.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची ओळख व्हावी, या उद्देशाने अष्टविनायक गणपतींच्या माहितीपर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. अकरा दिवस दररोज अष्टविनायकांपैकी एका गणपतीची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. त्या गणपतीचे स्थान, महत्त्व, वैशिष्ट्ये व पौराणिक संदर्भ यांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आली. त्यामुळे गणेशोत्सव हा केवळ उत्सव न राहता ज्ञान, संस्कार आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा जागर ठरला.
याचबरोबर गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी कल्पकता, कलात्मकता आणि सौंदर्यदृष्टीचा वापर करून विविध आकर्षक सजावटी साकारल्या. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळाला आणि गणेशोत्सवाच्या वातावरणात कलात्मकतेची भर पडली.
हा संपूर्ण गणेशोत्सव शाळेचे संस्थापक आदरणीय श्री. प्रशांत भीमराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. त्यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासोबतच भारतीय संस्कृती व परंपरांचे संवर्धन करणाऱ्या उपक्रमांना सातत्याने प्रोत्साहन मिळत आहे. प्राचार्या सौ. वैशाली लाडे, समन्वयक श्री. वैभव सोनवणे व श्री. तुषार देवरे यांच्या मार्गदर्शनामुळे गणेशोत्सवातील विविध उपक्रमांचे नियोजन व आयोजन सुरळीतपणे पार पडले.
गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी तिन्ही शाखांतील सर्व इन्चार्ज, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ड्रायव्हर बंधू व मावशी यांनी मनापासून सहकार्य केले. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून अकरा दिवसांचा हा उत्सव शिस्तबद्ध, संस्कारमय आणि अविस्मरणीय ठरला.
अकरा दिवस गणरायाच्या सान्निध्यात भक्ती, आनंद आणि संस्कारांची अनुभूती घेतल्यानंतर विसर्जनाचा क्षण मात्र सर्वांसाठी भावूक करणारा ठरला. आरतीचा निनाद, गणरायाचा जयघोष आणि *‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’*च्या घोषात प्रचिती परिवाराने भरलेल्या मनांनी आपल्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. गणरायाच्या आगमनाने मंगलमय झालेला शाळेचा परिसर विसर्जनावेळी भावनांनी भारावून गेला.
गणपतीच्या मिरवणुकीमध्ये विद्यार्थिनींनी सुंदर असा नृत्य आविष्कार व लेझीम नृत्य सादर केले
भक्तीला संस्कारांची, उत्सवाला ज्ञानाची आणि परंपरेला आधुनिक शैक्षणिक दृष्टिकोनाची जोड देणारा प्रचिती इंटरनॅशनल स्कूलचा अकरा दिवसांचा गणेशोत्सव विद्यार्थ्यांच्या मनावर संस्कारांची अमिट छाप उमटवून गेला.






















