प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये नवरात्रोत्सव व दसरा उत्साहात साजरा
प्रचिती इंटरनॅशनल स्कूलच्या कावठे, कासारे आणि साक्री या शाखांमध्ये नवरात्रोत्सव व दसरा सण विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत विद्यार्थ्यांनी नवरात्रीचे नऊ रंग अनुसरून दररोज त्या दिवसाच्या निर्धारित रंगांचे पोशाख परिधान केले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती, परंपरा आणि नवरंगांचे महत्त्व अनुभवता आले. नवरात्रोत्सवाच्या प्रत्येक दिवशी नऊ देवींचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. विद्यार्थिनींनी नऊ देवींची वेशभूषा साकारून देवींच्या विविध रूपांची माहिती दिली. विशेष म्हणजे, या वेशभूषेच्या माध्यमातून विद्यार्थिनींनी विज्ञानविषयक माहितीचेही सादरीकरण केले. त्यामुळे धार्मिक परंपरेसोबतच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत दररोज देवीची आरती करण्यात आली. तसेच पारंपरिक गरबा नृत्याचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी गरब्याच्या तालावर आनंदाने सहभाग घेत शाळेच्या परिसरात भक्तिमय आणि उत्साही वातावरण निर्माण केले. यावेळी विद्यार्थिनींनी नवदुर्गांच्या विविध रूपांवर आधारित नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली, तर लाठीकाठीच्या प्रात्यक्षिकातून पारंपरिक युद्धकलेचे आणि आत्मसंरक्षणाचे महत्त्व प्रभावीपणे अधोरेखित केले.
दसरा सेलिब्रेशनचे विशेष आकर्षण ठरली महिषासुरवधाची नाटिका! विद्यार्थिनींनी देवी दुर्गेच्या वेशभूषेतून आणि प्रभावी अभिनयातून स्त्रीशक्तीचे सामर्थ्य सादर केले. या नाटिकेतून वाईट प्रवृत्तींवर चांगल्या प्रवृत्तींचा विजय होतो, हा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.
यासोबतच विद्यार्थ्यांनी प्रभू श्रीराम, माता सीता आणि भक्त हनुमान यांच्या वेशभूषा साकारून भारतीय संस्कृतीतील आदर्श मूल्यांचे दर्शन घडवले. प्रभू श्रीराम यांच्या व्यक्तिमत्त्वातून सत्य, कर्तव्यनिष्ठा आणि मर्यादापालनाचा संदेश देण्यात आला. माता सीता यांच्या जीवनातून त्याग, धैर्य, संयम आणि आत्मसन्मानाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. तर भक्त हनुमान यांच्या भूमिकेतून निष्ठा, सेवाभाव, साहस आणि समर्पण या गुणांची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यात आली. या सादरीकरणातून विद्यार्थ्यांना रामायणातील आदर्श व्यक्तिमत्त्वांचा परिचय झाला.
याप्रसंगी विद्यार्थ्यांकडून विधिवत सरस्वती पूजन करून घेण्यात आले. ज्ञान, विद्या आणि बुद्धीची देवता असलेल्या माता सरस्वतीच्या पूजनातून शिक्षणाप्रती आदर आणि संस्कारांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.
या संपूर्ण उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीविषयी आदर, धार्मिक परंपरांची जाणीव, वैज्ञानिक दृष्टिकोन, कलागुणांचा विकास आणि आत्मविश्वास वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. विद्यार्थ्यांनी सर्व उपक्रमांत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या उपक्रमासाठी संस्थेचे संस्थापक व चेअरमन आदरणीय श्री. प्रशांत भीमराव पाटील, प्राचार्या सौ. वैशाली लाडे, समन्वयक श्री. तुषार देवरे व श्री. वैभव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
नवरंगांची उधळण, भक्तीचा जागर, रामायणातील आदर्श मूल्ये, पारंपरिक युद्धकलेचे दर्शन आणि स्त्रीशक्तीचा गौरव यांचा अनोखा संगम साधत प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये नवरात्रोत्सव व दसरा उत्सव संस्मरणीय ठरला.

























