वृत्तसंस्था : भारत आणि बांगला देश (IND vs BAN) यांच्यातील वन-डे मालिका नुकतीच संपली. यजमान बांगला देशने भारताचा 2-1 असा पराभव करत मालिका विजय साजरा केला. आता बांगला देश संघ कसोटीमध्येदेखील भारताला आव्हान देण्यासाठी सज्ज झाला आहे. दोन सामन्यांच्या या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना आज (बुधवार, दि. 14 डिसेंबर) पासून चट्टोग्रामच्या झाहूर अहमद चौधरी स्टेडियमवर सुरू होणार आहे. वन-डे मालिकेतील चुका टाळून भारत ही कसोटी मालिका जिंकण्यासाठी प्रयत्न करणार आहे. कारण, या मालिका विजयावरच भारताचा कसोटी चॅम्पियनशिपचा पुढील प्रवास अवलंबून आहे.
भारताचा कर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे पहिल्या कसोटीत खेळू शकणार नाही. त्यामुळे या कसोटीत भारताच्या रनमशिन विराट कोहलीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. या कसोटी सामन्यात विराट कोहलीला मोठमोठे कारनामे करण्याची नामी संधी आहे; पण संघातील कॉम्बिनेशन्स कशी असावीत, यावरून दोन्ही राहुल अर्थात प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार लोकेश राहुल यांची कसोटी लागणार आहे.
भारताचा कसोटी संघ – लोकेश राहुल (कर्णधार), शुभमन गिल, अभिमन्यू ईश्वरन, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, सौरभ कुमार, ऋषभ पंत, के. एस. भरत, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दूल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, उमेश यादव, नवदीप सैनी.
बांगला देशचा कसोटी संघ : (पहिल्या सामन्यासाठी) – महमुदूल हसन जॉयन, नजमूल होसैन शांतो, मोमिूनल, जाकारी होसैन, यासीर अली, मुश्फिकर रहिम, शाकिब अल हसन, लिटन दास, सोहन, मेहिदी हसन, तज्जूल, तस्किन अहमद, खालेद, इबादत होसैन, शॉरिफुल, रेजौल इस्लाम, अनामुल हक.
आज पहिली कसोटी (IND vs BAN)
सामन्याची वेळ : सकाळी 9 वाजता
थेट प्रक्षेपण : सोनी स्पोर्टस् नेटवर्क