पिंपरी – केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे छायाचित्र मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार मतदारांच्या नवीन नोंदणीसह मतदार यादीतील तपशीलात दुरुस्तीही केली जात आहे. हे करत असताना पिंपरी-चिंचवडमधील तीनही विधानसभा मतदारसंघात ९५ हजार ९६२ मतदार एकाच चेहऱ्याचे असल्याची माहिती समोर आली आहे.
निवडणूक आयोगाच्या वतीने मतदार नोंदणीचे काम निरंतर सुरू असते. तसेच मतदार याद्यांची दुरूस्तीही केली जाते. राज्यातील महापालिकांच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार याद्या अद्ययावत करण्यात येत आहेत. एकाच मतदारांची नावे ही वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या मतदारांचा शोध घेण्याची मोहीम निवडणूक विभागामार्फत राबविली जात आहे. या मोहिमेअंतर्गत पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्ह्यातील तब्बल ४ लाख ६७ हजार ४१९ मतदारांची नावे वेगवेगळ्या ठिकाणी असल्याचे आढळून आले आहे.
एका मतदाराचे नाव एकाच मतदारसंघात असावे, यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. एका व्यक्तीचे एकापेक्षा अधिक मतदारसंघात नाव असल्यास एकच नाव ठेवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे एकाच चेहऱ्याचे छायाचित्र असलेली आणि एकसारखी नावे असलेल्या व्यक्तींच्या संबंधित पत्त्यावर निवडणूक आयोगाकडून खातरजमा केली जाणार असून, एकसारखी व्यक्ती असेल तर एकच नाव मतदार यादीत ठेवले जाणार आहे. एकाच चेहऱ्याचे मतदार शोधण्यासाठी सॉफ्टवेअरची मदत घेतली जात आहे. पुणे जिल्ह्यात असे ४ लाख ६७ हजार ४१९ जण आढळले आहेत. त्यातील ३६ हजार ७७३ मतदार चिंचवड विधानसभा मतदारसंघातील, २१ हजार ८१९ मतदार पिंपरी विधानसभा मतदारसंघातील, ३७ हजार ३७० मतदार भोसरी विधानसभा मतदारसंघातील असे एकून ९५ हजार ९६२ मतदार एकाच चेहऱ्याची असल्याचे समोर आले आहे. त्याचप्रमाणे मावळ विधानसभा मतदारसंघात १३ हजार १०८ मतदार एकाच चेहऱ्याचे असल्याचे समोर आले आहे.