पिंपरी:- चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर राज्यातील अनेक राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त केला. आज माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते अजित पवार आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पिंपळे गुरव येथील निवासस्थानी लक्ष्मणभाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. जगताप कुटुंबियांना या दुःखातून सावरण्यासाठी बळ मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना केली.
आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांची भेट घेतली. त्यावेळी माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, संजोग वाघेरे पाटील, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी नगरसेवक अतुल शितोळे, बाबुराव चांदेरे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
भाऊंच्या निधनानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री तानाजी सावंत, आमदार सुनील शेळके, महेश लांडगे, उमा खापरे यांच्यासह अनेक राजकीय, सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी भाऊंच्या निधनानंतर शोक व्यक्त केला. या आघातातून जगताप कुटुंबियांना सावरण्यासाठी बळ मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना केली.
नगरसेवक, महापौर ते विधिमंडळातील तडफदार प्रतिनिधी म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटवणारे नेतृत्व काळाने हिरावून नेले आहे. जनतेच्या प्रश्नासाठी तळमळीनं काम करणारा झुंजार लोकप्रतिनिधी, जवळचा सहकारी गमावला आहे. राजकीय, सामाजिक जीवनात त्यांनी केलेलं काम कायम शहर वासियांच्या स्मरणात राहील. पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात त्यांचं मोलाचं योगदान दिले अशा भावना अजितदादा यांनी व्यक्त केल्या.