पिंपरी :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका हददीतील औद्योगिक परिसरात निर्माण होणा-या केवळ अघातक औद्योगिक कच-याचे संकलन महानगरपालिकेमार्फत करण्यात येत असून घातक कच-याची विल्हेवाट शास्त्रोक्त पध्दतीने लावणे हे औद्योगिक आस्थापनांवर बंधनकारक आहे. त्यानुसार अंमलबजावणी करण्यात यावी, असे आवाहन महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील औद्योगिक वसाहतीमधील घनकचरा व्यवस्थापनाबाबत दि. २१ डिसेंबर २०२२ रोजीचे “क” क्षेत्रीय कार्यालयामध्ये लघुउद्योजक, उद्योजक व MCCIA यांच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. त्यामध्ये निश्चित करण्यात आलेल्या धोरणानुसार महानगरपालिकेमार्फत औद्योगिक परिसरातील अघातक घनकचरा संकलन करण्याचे काम दि. २ जानेवारी २०२३ पासून प्रत्यक्ष सुरु करण्यात आलेले आहे.
महानगरपालिकेतर्फे सुरु करण्यात आलेल्या कचरा संकलनामध्ये औद्योगिक आस्थापनेतून निर्माण होणारा केवळ अघातक घनकचरा देणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत घातक कचरा मिश्र स्वरूपात देण्यात येणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. अशा स्वरुपाच्या घातक कच-याच्या अशास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लावल्यामुळे पर्यावरणाची हानी होते. तसेच त्यावर प्रक्रिया करणे, या बाबींवर मोठा परिणाम होत असून ते कायद्याने निषिध्द आहे, अधिनियमातील प्रचलित तरतूदी व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निर्देश विचारात घेऊन अशा कच-याची औद्योगिक आस्थापनांनी विल्हेवाट लावण्यात यावी.
कोणत्याही औद्योगिक आस्थापनेद्वारे घातक कचरा महानगरपालिकेच्या संकलन व्यवस्थेत दिल्याचे आढळून आल्यास नाईलाजाने संबंधित आस्थापनेविरुध्द घनकचरा व्यवस्थापन नियम, २०१६ व मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम ११५ नुसार फौजदारी व दंडात्मक कारवाई करण्यात येईल, याची नोंद घेवून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असेही महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी म्हटले आहे.