भाजपला मताधिक्याने निवडून देण्याचा कोकणवासीयांचा निर्धार
पिंपरी– चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय (आठवले गट), रासप, शिवसंग्राम संघटना, रयत क्रांती संघटना, प्रहार संघटना या महायुतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारासाठी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. मतदारसंघात वास्तव्याला असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तसेच कोकणाच्या अन्य भागातील प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचून त्यांच्याशी संवाद साधला. तसेच सांगवी येथे झालेल्या कौटुंबिक स्नेह मेळाव्यात अश्विनी लक्ष्मण जगताप यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी कोकणवासीयांना केले.
आमदार निलेश राणे यांनी काळेवाडी, रहाटणी, थेरगाव, चिंचवडगाव सांगवीसह मतदारसंघातील अन्य भागात जाऊन सिंधुदूर्ग जिल्ह्यातील तसेच कोकणाच्या अन्य भागातील नागरिकांशी संवाद साधला. काही भागात त्यांनी पदयात्राही काढली. तसेच सांगवीमध्ये झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा मंडळाच्या कौटुंबिक स्नेह मेळाव्यात कोकणवासीयांना मार्गदर्शन केले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा मंडळाचे अध्यक्ष अजय पाताडे, माजी नगरसेविका सुजाता पालांडे, माजी नगरसेवक प्रमोद ताम्हणकर, सुनील पालकर, ऍड. चंद्रकांत गायकवाड यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्हा मंडळाचे शहरातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार निलेश राणे म्हणाले, “दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी चिंचवड मतदारसंघाच्या विकासाचे स्वप्न पाहून ते सत्यात उतरवण्याचे काम केले. त्यांनी या मतदारसंघाचा कायापालट केला. मतदारसंघातील अपुरी विकासकामे पूर्ण करण्यासाठी कोकणवासीयांनी त्यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या पाठीशी उभे राहावे. शहरातील कोकणवासीयांच्या समस्या सोडवण्यासाठी भाजप पक्ष कटिबद्ध आहे.