धुळे : केबल चालकांकडून डिजीटल सेट टॉप बॉक्स बील देण्यात यावे. ते बंधनकारक करावे, अशी मागणी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाने केली आहे. याबाबत जिल्हाप्रशासनाला निवेदन देण्यात आले.
निवेदनाचा आशय असा, महाराष्ट्र शासनाने 31 डिसेंबरपर्यंत सर्व केबल ग्राहकांना सेट टॉप बॉक्स बसविण्याची सक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातल्या केबल ग्राहकांना चॅनल डिजिटल माध्यमातून पाहता यावे. यासाठी सेट टॉप बॉक्स बसविण्यात येत आहेत. शासन धोरणानुसार धुळे महापालिका, शिरपुर, दोंडाईचा, साक्री नगरपालिका, अवधान, महिंदळे, वलवाडी, निजामपुर येथे सेटटॉप बॉक्स बसविण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात 31 डिसेंबर 2016 पर्यंत उर्वरीत धुळे जिल्ह्यात हे सेटटॉप बॉक्स बसविणे अनिवार्य करण्यात आले. धुळे शहरात 160 च्या वर केबल ऑपरेटर्स असून त्यांच्या माध्यमातून हात वे व साई डिजीटल या कंपनीच्या माध्यमातून सेटटॉप बॉक्स बसविण्यात येत आहेत.
यामध्ये साधा सेट टॉप बॉक्स 1700 ते 2000 रुपयांपर्यंत व डिजीटल फुल एच.डी. सेट टॉप बॉक्स 3000 रुपयांपर्यंत ग्राहकांना केबल चालकांच्या माध्यमातून बसवून देण्यात येत आहे. सेट टॉप बॉक्सचे कुठलेही बील ग्राहकांना लागणार नसून ग्राहक संरक्षण कायद्याचा एकप्रकारे तो भंग आहे. कारण या बॉक्सचा वॉरंटी पिरीयड किती, खराब झाल्यास त्याची जबाबदारी कोणाची, या बॉक्सची मार्केट होलसेल किंमत किती, त्यावर कोणते टॅक्सेस लावले जातात. याबाबत ग्राहक अनभिज्ञ असून शहराच्या वेगवेगळ्या भागात केबल चालकांकडून वेगवेगळ्या किंमती आकारल्या जात आहेत. या संपूर्ण मोहिमेत प्रशासनाचा या यंत्रणेवर कुठलाही वचक नाही.