कर्मचारी महासंघातर्फे महापालिकेसमोर आंदोलन
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्यलेखापाल राजेश लांडे यांना मुख्यलेखापाल पदावरुन हटविण्यात यावे, या मागणीसाठी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर महापालिका कर्मचारी महासंघातर्फे आंदोलन करण्यात आले.
महापालिका कर्मचारी महासंघाच्या म्हणण्यानुसार पिंपरी महापालिकेच्या मुख्यलेखापालपदी शासनातर्फे राजेश लांडे यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेच्या कर्मच्याऱ्यांना दिलेल्या पदोन्न्तीच्या हक्कास बाधा निर्माण झाली आहे.
महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार मुख्य लेखापाल हे पद महापालिकेच्या आस्थापनेवरील पदोन्न्ती साखळी पद आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेत त्या पात्रतेचे कर्मचारी असताना सरकारी कर्मचारी मुख्यलेखापालपदी नेमणुक करु नये, त्या जागी महापालिकेतील वरिष्ठ व पात्र व्यक्तीलाच पदबढती द्यावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष शशिकांत झिंजुर्डे यांनी केली.
तसेच महापालिकेच्या कर्मच्या-यांना केंद्र सराकारी कर्मच्या-यांप्रमाणे महागाई भत्ता हा 1979 मध्ये लागू केलेला आहे. मात्र सध्याचे मुख्यलेखापाल लांडे यांनी करारनाम्याकडे दुर्लक्ष करुन त्यानुसार द्यावयाच्या महागाई भत्त्यास अनुकुलता दर्शविली नाही. त्यामुळे हे लेखापाल कर्मच्या-यांच्या हितसंबंधाच्या आड येत आहेत. याबरोबरच कर्मच्या-यांच्या वैद्यकीय प्रतिपुर्ती, बोनस, वेतनवाढ याबाबत असंतोष निर्माण झाला आहे. लांडे हे केवळ राज्य सरकार जवळ तडजोड करुन पिंपरी महापालिकेत आले आहेत, असा आरोपही लांडे यांच्यावर कर्मचारी महासंघाकडून करण्यात आला.
यासंबंधी महासंघातर्फे राज्य शासन व मुख्यमंत्री यांच्याशी पत्रव्यवहार झालेला आहे. तरी त्यावर कोणतीही कारवाई केली जात नसल्याने हे आंदोलन केले असून यापुढेही त्यांना हटवले नाही तर आम्ही रस्त्यावर उतरु, असा इशाराही महासंघाने यावेळी दिला. यावेळी कर्मच्याऱ्यांच्या हातात निषेधाचे फलक व लाल झेंडे घेऊन राजेश लांडे चले जाव अशा घोषणा दिल्या.