पिंपरी : महापालिका निवडणूक यंदा चार सदस्यीय प्रभाग पध्दतीने होत आहे. त्यामुळे एका मतदाराला चार सदस्यांना मतदान करावे लागणार आहे. परिणामी एका मतदाराला नियमित वेळेपेक्षा जास्तवेळ मतदानासाठी लागणार आहे. त्यामुळे मतदानाच्या वेळेत सायंकाळी शेवटच्या टप्प्यानंतर एक तासाने वाढ करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे पिंपरी-चिंचवड शहर-जिल्हा सरचिटणीस अमोल थोरात यांनी राज्य निवडणूक आयुक्तांना केली आहे. या निवेदनात नमूद केले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरात 32 प्रभागांसाठी निवडणूक होणार आहे. एका प्रभागात 45 ते 50 हजारांपर्यंत मतदार आहेत. या वेळी एक मतदार चार उमेदवारांना मतदान करणार आहे. त्यामुळे किमान 700 मतदारांसाठी एक बुथ या प्रमाणे शहरात मतदानाचे नियोजन निवडणूक विभागातर्फे करण्यात आले आहे. असे असले, तरी एका मतदाराला नियमित वेळेपेक्षा जास्त वेळ या मतदानासाठी लागणार आहे. त्यामुळे मतदान केंद्राबाहेर रांगा लागण्याची शक्यता आहे. तसेच शेवटच्या टप्प्यात सायंकाळी या रांगांमध्ये वाढ होऊ शकते. परिणामी काही मतदारांना मतदानाला मुकावे लागण्याची शक्यता आहे.