पिंपरी-चिंचवड विभागातील पिफचे रमेश देव व सीमा देव यांच्या हस्ते उद्घाटन

पिंपरी : मला कालच पुरस्कार मिळाला. त्याबद्दल आनंद आहे. पुरस्कार हे कलाकाराचे टॉनिक असते, तो योग्य वेळेत कलाकाराला मिळावा, असे मत अभिनेत्री सीमा देव यांनी व्यक्त केले.

पुणे फिल्म फाउंडेशन, महाराष्ट्र शासन आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या 15 व्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (पिफ) या विस्तारित चित्रपट महोत्सवाचे पिंपरी-चिंचवड विभागातील उद्घाटन आज शुक्रवारी (दि. 13) सायंकाळी सहाच्या सुमारास कार्निव्हल सिनेमा (बीग सिनेमा) स्क्रीन नं- 1, चिंचवड येथे अभिनेते रमेश देव व सीमा देव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयुक्त दिनेश वाघमारे होते. अभिनेते रमेश देव, अभिनेत्री सीमा देव, पिफचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, साहाय्यक पोलीस आयुक्त राम मांडूरके, पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे, सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम, पिंपरी-चिंचवड फेस्टिव्हलचे सांस्कृतिक समन्वयक प्रवीण तुपे, कार्यकारी अभियंता सतीश इंगळे, रवी कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवडमध्ये हा महोत्सव दि.13, 14,15 जानेवारी असा तीन दिवस चालणार असून महोत्सवातील 225 चित्रपटांपैकी 46 उत्कृष्ट चित्रपट दाखविण्यात येणार आहे. यावेळी जब्बार पटेल प्रास्ताविकात म्हणाले की, पिफ अंतर्गत पिंपरी-चिंचवडमध्ये हे महोत्सवाचे तिसरे वर्ष आहे. नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळतो. महापालिकेने सहकार्य केल्यास आणखी कार्यक्रम घेता येतील. पिंपरी-चिंचवड महापालिकेने सहकार्य केल्यास स्वतंत्र महोत्सव भरवता येईल.

अभिनेते रामेश देव म्हणाले की, सीमाचे कौतुक पाहण्यासाठी मी आलो. रसिकांनी कलाकारांचे कौतुक करावे आणि प्रोत्साहन द्यावे एवढीच अपेक्षा.

तत्पूर्वी मकरंद पाटणकर व मनीषा लताड आणि सहकारी यांचा सुमधुर गीतांचा कार्यक्रम पार पडला. तसेच उद्घाटन कार्यक्रमानंतर स्व. ओम पुरी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर लगेचच स्व.ओम पुरी यांचा ‘जाने भी दो यारो’ हा चित्रपट दाखविण्यात येत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here