साक्री – प्रचिती इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेज, साक्री येथे वीर भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम पार पडला. यावेळी शाळेचे प्राचार्य अतुल देव, प्राचार्या भारती पंजाबी, व्यवस्थापक वैभव सोनवणे, तुषार देवरे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. प्रसंगी, वीर भगतसिंग यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहण्यात आली.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये असंख्य शूरवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. ज्यामुळे आज आपण आनंदाने स्वतंत्र म्हणून जगतोय! या स्वातंत्र्य लढ्यामध्ये अगणित तरूणांनी हौतात्म्य पत्करले. यातीलच एक नाव म्हणजे हुतात्मा भगतसिंग. केवळ 23 वर्ष 5 महिने आणि 25 दिवसांचे आयुष्य त्यांना लाभले. मात्र, या अल्पशा आयुष्यात त्यांनी वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करीत, येणाऱ्या पिढ्यांना प्रेरक असे कार्य पाठीमागे ठेवले आहे. भगतसिंग यांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 रोजी झाला. घरामध्ये असणाऱ्या क्रांतिकारी वातावरणाने त्यांच्यावर देशभक्तीचे संस्कार झाले. आपण आपल्या देशाला इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी काहीतरी केले पाहिजे, हा विचार त्यांनी बालपणापासून जपला होता. जालियनवाला बाग हत्याकांड आणि इंग्रज भारतीयांवर करीत असलेला अत्याचार पाहून, त्यांनी आपण याचा विरोध कृतीच्या माध्यमातून करायचा असे ठरविले. महाविद्यालयीन जीवनामध्ये त्यांचे सर्व मित्र पण क्रांतीच्या विचाराने प्रेरित होते. या सगळ्यांना सोबत घेऊन संघटना निर्मितीचे कार्य त्यांनी केले. नवजवान भारत सभेची त्यांनी स्थापना केली. हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन मध्ये त्यांनी काम करून वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. या सर्वांचे अंतिम ध्येय इंग्रजांच्या गुलामीतून मुक्तता हेच होते, असे मनोगत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here