पिंपरी : विधानसभा निवडणुकीत पिंपरी चिंचवड शहरात आघाडीने कॉंग्रेस पक्षाला एकही मतदारसंघ सोडला नाही. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. या कार्यकर्त्यांची भूमिका समजून घेण्यासाठी व पुढील रणनिती ठरविण्यासाठी रविवारी (दि. 6) सकाळी 10.30 वाजता पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसची बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिली आहे. पिंपरी, चिंचवड किंवा भोसरी विधानसभा मतदारसंघापैकी एक जागा कॉंग्रेससाठी सोडली जावी, अशी मागणी कॉंग्रेसचे
शहराध्यक्ष सचिन साठे यांनी प्रदेश कॉंग्रेसकडे वेळोवेळी केली होती. तरीदेखील आघाडीत झालेल्या वाटपानुसार पिंपरी चिंचवड शहरात एकही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हटवादी भूमिकेमुळे कॉंग्रेसला मिळाली नाही. आज शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. भोसरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीची उमेदवारी घेण्यास कोणीही इच्छुक नसल्यामुळे तेथे आघाडीच्यावतीने एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. किमान भोसरी विधानसभेची तरी जागा कॉंग्रेसला मिळायला हवी होती, असे साठे यांनी पत्रकात म्हटले आहे. कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या या भावना विचारात घेऊन याबाबत वरिष्ठांशी समन्वय साधण्यात आला आहे. वरिष्ठांचे म्हणणे सांगण्यासाठी व कार्यकर्त्यांचे मनोगत जाणून घेण्यासाठी आकुर्डी प्राधिकरणातील हरिदास नायर यांच्या कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत झालेली चर्चा व निर्णय वरिष्ठांना कळविला जाईल. या बैठकीसाठी शहर कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी, सर्व सेलचे पदाधिकारी, ज्येष्ठ व महिला, युवा कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केले आहे.