पिंपरी :- चिंचवड विधानसभेतील सर्वपक्षीय उमेदवार राहुल कलाटे यांना दिवसेंदिवस विविध संघटना, सामाजिक संस्थांसह सोसायट्यांच्या पाठिंबा मिळत आहे. आज वाकड परिसरातील तीनशेहून अधिक सोसायट्यांसह शहर पातळीवरील हौसिंग फेडरेशनने कलाटे यांना पाठिंबा जाहीर केल्यामुळे कलाटे यांचे पारडे जड झाले आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी (शनिवारी) कलाटे यांनी सकाळी सात वाजल्यापासूनच वाकडसह चिंचवड मतदारसंघातील विविध सोसायट्यांच्या पदाधिकार्यांशी चर्चा करत विविध प्रश्न सोडविण्याचा विश्वास व्यक्त केला. मतदारसंघातील रखडलेले अनधिकृत बांधकाम, शास्तीकर, बिघडलेला पाणीपुरवठा आणि कचर्याची समस्या सोडविण्यासाठी आपण कटीबद्ध राहू, अशी ग्वाही दिली. यावेळी विविध सोसायट्यांमध्ये झालेल्या बैठकांद्वारे तब्बल 300 हून अधिक सोसायट्यांच्या प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला.
हौसिंग फेडरेशनचे सचिव सुदेश राजे व सचिव गर्ग यांनी राहुल कलाटे यांना पाठिंबा जाहीर केला. सोसायटीधारकांना कचरा संकलनापासून ते पिण्याची पाणी, सुरक्षितता, अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. मते मागण्यापुरती राजकीय मंडळी येतात. निवडणूक पार पडल्यानंतर कोणीही फिरकत नाही. हे चित्र बदलणे आवश्यक आहे. शहराचा विकास करताना सोसाट्यांच्या सूचनांचाही विचार केला जावा. सोसायट्यांनाही निर्णय प्रक्रियेत सामावून घेतले जावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. सोसायटीधारकांच्या समस्या सोडविण्यासाठी कलाटे यांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा सुदेश राजे यांनी व्यक्त केली.
तसेच राष्ट्रीय जनमंच संघटनेच्या वतीने प्रदेश अध्यक्ष अविनाथ झेंडे, प्रदेश उपाध्यक्ष हरिश कदम यांनी राहुल कलाटे यांना पाठिंबा दिला. चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या समतोल आणि शाश्वत विकासासाठी हा पाठिंबा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अंगमेहनत कष्टकरी संघर्ष समिती पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने अशोक मिर्गे, शैलेंद्र गाडे व परमेश्वर पवार यांनी कलाटे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मोलकरीण पंचायतच्या वतीने रजनी पाटोळे, वासंती शेळके यांनी तर अंगणवाडी संघटनेच्या वतीने शैलजा चौधरी, सुनंदा साळवे, पथारी पंचायतीच्या वतीने दामोदर मांजरे, मारुती निंबाळकर, संगीता शिंदे, जयश्री भांबरे, तानाजी हराळे, चंद्रकांत क्षिरसागर, दत्ता साखुंडे, अंगद जाधव यांनी कलाटे यांना विनाशर्त पाठिंबा जाहीर केला आहे.