भाजपचे राज्यमंत्री बाळा भेगडेंचा दारुण पराभव
तळेगाव – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेली संधीच्या जोरावर राष्ट्रवादीचे सुनील शेळके मावळ विधानसभेच्या निवडणुकीत विक्रमी मताधिक्याने विजयी झाले. गेली 25 वर्षे भाजपाचा अभेद्य राहिलेला मावळ गढ राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टीच्या सुनील शंकरराव शेळके यांनी एकतर्फी सर केला. त्यांनी 93 हजार 612 मतांची आघाडी घेत भाजपा शिवसेना युतीचे उमेदवार राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांचा दारुण पराभव केला. सुनील शेळके यांना एकूण एक लाख 67 हजार 141 मते मिळाली. प्रतिस्पर्धी पराभूत उमेदवार बाळा भेगडे यांना केवळ 73 हजार 529 मते मिळाली.
मावळ विधानसभा मतदार संघात यावेळी 3 लाख 48 हजार 462 मतदार होते. त्यापैकी दोन लाख 47 हजार 961 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. इतर पाचही उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.
कमालीची उत्सुकता लागलेल्या मावळ विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीच्या या विजयाने तालुक्यातील राजकीय परिवर्तनाचे संकेत स्पष्ट केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुप्रिया सुळे, सत्येंद्रराजे दाभाडे(सरकार), याज्ञसेनीराजे दाभाडे, माजी आमदार कृष्णराव भेगडे, माजी मंत्री मदन बाफना, माजी खासदार विदुरा नवले आदिंनी सुनील शेळके यांचे दूरध्वनीवरून अभिनंदन केले आहे.
गुरुवारी सकाळी आठ वाजता तळेगाव दाभाडे येथे मतमोजणी सुरू झाली. पहिल्या फेरीत 1997 मतांची आघाडी घेतलेल्या सुनील शेळके यांनी ती कायम राखत शेवटच्या 27 व्या फेरीअखेर एकतर्फी 93 हजार 612 मताधिक्य घेत विजय प्राप्त केला.
“विजयाचे श्रेय मी मावळच्या जनतेला देतो. ही निवडणूक माझी नसून सर्वसामान्य जनतेच्या अस्मितेची होती. प्रामाणिकपणे केलेले कार्य, लोकहिताची कामे आणि मोठा जनाधार याची दखल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पवार साहेब, अजितदादा पवार, काँग्रेस, मनसे, स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टीतील नेते यांनी घेत माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याचा आज खऱ्या अर्थाने विजय झाला आहे. मावळात काही गावात अतिवृष्टी झाली. तेथील शेतक-यांच्या भेटीला आपण प्रथम जाणार आहोत.”
– सुनील शंकरराव शेळके, नवनिर्वाचित आमदार, मावळ
उमेदवार, पक्ष, मिळालेली मते याप्रमाणे :-
सुनील शेळके – राष्ट्रवादी काँग्रेस- 1 लाख 67 हजार 141
संजय (बाळा) भेगडे- भाजपा- 73 हजार 529
मंदाकिनी भोसले- बसप- डिपॉझिट जप्त
रमेश ओव्हाळ – वंचित- डिपॉझिट जप्त
खंडूजी तिकोणे- अपक्ष- डिपॉझिट जप्त
धरमपाल तंतरपाळे- डिपॉझिट जप्त
मुकेश अगरवाल- डिपॉझिट जप्त
नोटा- 1485