पिंपरी :- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेतर्फे रंगभूमी दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ रंगकर्मींचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी पिंपरी चिंचवड मधे गेली अनेक दशके रंगभूमीची विविध माध्यमातून सेवा केलेल्या ज्येष्ठ रंगकर्मींचा सत्कार चिंचवड मधील ज्येष्ठ तबलावादक धोंडीराम सायकर यांच्या हस्ते करण्यात आला. हा कार्यक्रम परिषदेच्या ‘पं. पद्माकर कुलकर्णी कलामंदिरात’ संपन्न झाला.
अभिनेते, संगीतकार, नाटककार, कवी मधु जोशी, नाट्यलेखक, दिग्दर्शक माधव पाटील, अभिनेते, दिग्दर्शक माधव जोगळेकर, अभिनेते डॉक्टर जयंत महाजन व लोककलाकार, लोकप्रबोधन कलाकार शारदा मुंडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी परिषदेच्या रंगकर्मींनी ‘पांडवप्रताप’ या विनोदी एकांकिकेचे अभिवाचन करण्यात आले. सत्कारार्थी शारदा मुंडे यांनी सावित्रीबाई फुलेंवरील एकपात्री सादरीकरण केले.
डॉक्टर महाजन, मधु जोशी, माधव पाटील यांनी रंगभूमीच्या पुर्वीपासून आजपर्यंतच्या वाटचालीचा आढावा व स्वानुभव कथन केले. रंगभूमी परिनिरीक्षण मंडळ सदस्यपदी निवड झाल्याबद्दल नरेंद्र आमले यांचाही सत्कार करण्यात आला. परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी प्रास्ताविक केले. गौरी लोंढे यांनी सूत्र संचालन व सुहास जोशी यांनी आभार प्रदर्शन केले. संयोजन किरण येवलेकर, राजेंद्र बंग, संतोष शिंदे, महेश लाकाळ, रघु ढेमरे यांनी केले.