पिंपरी : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या पुणे क्षेत्रीय कार्यालयाकडून पिंपरी-चिंचवड व पुणे जिल्हा परिसरात विकसित केलेल्या सदनिका व भूखंड गरजूंसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यासाठी नागरिकांना अर्ज करण्यासाठी देण्यात आलेली मुदत 2 नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. याबाबत पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा भाजपचे सरचिटणीस व संत ज्ञानेश्‍वर म्हाडा फेडरेशनचे अध्यक्ष बाबू नायर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती. म्हाडाकडून 5 सप्टेंबर रोजी स्थानिक वर्तमानपत्रातून सुमारे 2503 सदनिका व 67 भूखंडांच्या विक्रीची जाहिरात देण्यात आली होती. यामध्ये अल्प उत्पन्न गट ते उच्च उत्पन्न गटातील विविध वर्गातील व आरक्षण कोट्यातील नागरिक अर्ज करू शकतात. मोरवाडी पिंपरी, म्हाळुंगे ता. खेड, वानवडी पुणे, शिवाजीनगर सोलापूर, जुळे सोलापूर, दिवे ता. पुरंदर, सासवड, वाठार निंबाळकर जि. सातारा या ठिकाणी असलेल्या म्हाडाच्या प्रकल्पांतील सदनिका व भूखंड विक्रीस उपलब्ध करून देण्यात आले आहेत.  यासाठी अर्ज करण्याची मुदत 5 ऑक्टोबरपर्यंत देण्यात आली होती. अर्ज करण्याची ही मुदत वाढवून द्यावी व सदनिका आणि भूखंडांची किंमत कमी करावी, अशी मागणी नायर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. सुधारित जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्जासाठी नोंदणीची मुदत 2 नोव्हेंबरपर्यंत वाढवून देण्यात आली आहे. तसेच सोडतीसाठी ऑनलाईन अर्जाची मुदत 3 नोव्हेंबर, ऑनलाईन रक्कम स्वीकृती 4 नोव्हेंबर, बँकेत डी.डी / पी.ओ. व्दारा अनामत रक्कम भरण्याची अंतिम तारीख 5 नोव्हेंबर, सोडतीसाठी स्वीकृती अर्जांच्या प्रारुप यादींची प्रसिध्दी 17 नोव्हेंबर, हरकतीवरील अपिल व सुनावणी 19 नोव्हेंबर, सोडतीसाठी स्वीकृत अर्जांच्या अंतिम यादीची प्रसिध्दी 21 नोव्हेंबर दुपारी 1 वाजेपर्यंत वाढवून देण्यात आली आहे. स्वारगेट येथील श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता ही सोडत काढण्यात येणार आहे. सोडतीमधील यशस्वी व प्रतिक्षा यादीवरील अर्जदारांची नावे म्हाडाच्या संकेत स्थळावर 24 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती बाबू नायर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here