Chaupher News
पिंपरी : महापालिकेतील शिक्षण समितीत साहित्य खरेदीचे प्रकरण गाजत असतानाच शिक्षण समिती सदस्यांनी स्थायी समितीपुढे साहित्य खरेदीचे सहा विषय सादर केले होते. मात्र, या प्रस्तावात कोणती साहित्य खरेदी, प्रमाण किती, खर्च किती याची माहिती नसल्याने स्थायी समितीने प्रस्ताव पुन्हा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडिगेरी होते.
महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना स्काऊट गाईड गणवेश खरेदी करणे. विद्यार्थ्यांचा पेहराव आकर्षक करण्यासाठी सन २०१९-२० या शैक्षणिक वषार्पासून पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी हाफ जॅकेट खरेदी करणे, विद्यार्थ्यांच्या आरोग्य हितासाठी सर्व विद्यार्थ्यांना पाणी पिण्याकरीता कॉपर (तांबे) बाटली खरेदी करूत त्याचे वितरण करणे. उपक्रमशील बारा शाळेतील पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी टॅब खरेदी केले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना मध्यान भोजनासोबत पौष्टिक आहार म्हणून अंडी आणि सफरचंद, डाळींब, केळी असे फळ देण्यात येणार आहे.
मेंदू तलख व्हावा, म्हणून विद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीताचे धडे खासगी संस्थेतर्फे देण्यात येणार आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यांमागे दरवर्षी पाचशे रुपये खर्च असून, पुस्तक व साउंट ट्रॅक संचाची किंमत तीनशे रुपये आहे. शाळांमधील ग्रंथालयासाठी थेट पद्धतीने दोन लाखांची पुस्तके खरेदी केले जाणार आहेत. सर्व प्राथमिक शाळेत डिजिटल क्लास रूम सुरू केले जाणार आहेत. शिक्षण समितीचे सदस्य प्रस्ताव स्थायी समोर आले होते.
दरम्यान, सभापती विलास मडिगेरी म्हणाले, शिक्षण समितीचे सर्व प्रस्ताव सदस्य प्रस्ताव असून, त्यात सविस्तर माहिती नाही. निविदा प्रक्रिया राबविलेली नाही. त्यामुळे प्रशासनाकडून सविस्तर माहितीसह प्रस्ताव सादर करण्याचा सूचना केली.