Chaupher News

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने बांधण्यात आलेल्या एम्पायर इस्टेट येथील संत मदर तेरेसा मुख्य उड्डाण पुलावर चढण्या व उतरण्यासाठी उभारण्यात आलेल्या रॅम्पचे लोकार्पण महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसदस्य शितल शिंदे, शैलेश मोरे, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, कार्यकारी अभियंता प्रमोद ओंबासे, जनसंपर्क अधिकारी रमेश भोसले, उपअभियंता संजय साळी, विजय भोजने, दिपक पाटील, संजय काशिद, बापू गायकवाड, रविंद्र सुर्यवंशी, सुनिल पवार, बाळासाहेब शेटे, सल्लागार मिलिंद कुलकर्णी, जेष्ठ नागरिक संघाचे प्रतिनिधी व एम्पायर इस्टेट मधील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रकल्पासाठी एकूण 12.69 लाख रुपये खर्च आलेला असून काळेवाडी- देहू आळंदी रस्त्यावरील दोन स्वतंत्र रॅम्पची लांबी प्रत्येकी 410 मीटर व दोन स्वतंत्र रॅम्पची रुंदी प्रत्येकी 5.05 मीटर आहे. पुलावरुन खाली येणारा रॅम्प 105 मीटरचा असून पुलावर जाणारा रॅम्प 90 मीटरचा आहे. रॅम्पमुळे पिंपरी चिंचवड भागातील वाहतूक सुरळीत होणार असून औंध- रावेत व पुणे- मुंबई बायपासकडून येणारी वाहतूक निगडी- दापोडी (पुणे- मुंबई) रस्त्याशी जोडली जाणार आहे. काळेवाडी, थेरगांव, रहाटणी या भागातील नागरिकांना महानगरपालिकेमध्ये व निगडी- दापोडी (पुणे- मुंबई) रस्त्यावर येण्यासाठी सध्या पिंपरी किंवा चिंचवड भागातून यावे लागते. या नविन रॅम्प्समुळे या भागातील नागरीकांना महानगरपालिकेमध्ये व निगडी- दापोडी (पुणे- मुंबई) रस्त्यावर येण्यासाठी कमी वेळ लागणार असून सुमारे १.५० कि.मी. अंतर कमी होणार आहे.

एम्पायर इस्टेटमधील नागरिकांना काळेवाडी, थेरगांव, रहाटणी या भागात येण्यासाठी सध्या चिंचवडगांव किंवा पिंपरी भागातून यावे/ जावे लागते. नविन रॅम्पमुळे काळेवाडी, औंध, रावेत, हिंजवडीस जाण्यासाठी सोयीचे व कमी अंतराचे मार्ग उपलब्ध झाला आहे. शहरातील दक्षिण उत्तर वाहतूक सुरळीत झाली असून सदरचे रॅम्प वाहतूकीच्यादृष्टीने अत्यंत गरजेचे आहेत. नवीन बीआरटीएस कॉरिडॉरमुळे सार्वजनिक वाहतुक व्यवस्था सक्षम होणेस मदत होणार आहे. या व्यवस्थेत दररोज १ -१.५० लाख प्रवासी अपेक्षित आहेत. त्यामुळे रॅम्पच्या वाहतूकीमुळे नागरिकांसनिगडी- दापोडी (पुणे- मुंबई) रस्त्यावरील बीआरटीएस बस स्टॉपची होणारी वाहतूक सुरळीत होणार आहे. एम.एम.स्कूल चौक, शगुन चौक, पिंपरी चौक व अहिल्यादेवी होळकर चौक येथील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होपणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here