Chaupher News
पुणे : कात्रज बोगद्याजवळ डोंगरावर अचानक वणवा पेटला होता. नेमके याचवेळी अभिनेते सयाजी शिंदे व नगरसेवक राजेश बराटे येथून जात होते. त्यांनी हा वणवा पाहताच वणवा पसरून अन्य झाडांना नुकसान पोहोचू नये, यासाठी तातडीने तेथेच असलेल्या झाडांच्या फांद्यांनी हा वणवा विझवला.
अभिनेते सयाजी शिंदे यांचे वृक्षप्रेम जगजाहीर आहेत. आजच्या घटनेतून अभिनेते सयाजी शिंदे यांच्या वृक्षप्रेमाची पुन्हा एकदा प्रचिती आली. हिंदी, मराठी, तमिळ, मल्ल्याळम, तेलगू, कन्नड, चित्रपटातून जितक्या बहुरंगी भूमिका त्यांनी वठवल्या आहेत. तितक्याच बहुरंगी पद्धतीने वृक्षसंवर्धनासाठी ते सतत नवनवीन उपक्रम राबवित असतात.
त्यांनी राज्यात 19 ठिकाणी तब्बल साडेतीन लाख झाडे लावून ती स्थानिकांच्या मदतीने जगवण्याचा प्रयत्न केला आहे. सयाजी पार्क या उपक्रमातून देशी झाडांच्या देवराया उभारल्या आहेत. वृक्ष संवर्धनासाठी त्यांनी नुकतीच ट्री स्टोरी ही संस्था स्थापन केली आहे.