पिंपरी : इंद्रायणी नदीत रसायनयुक्त सांडपाणी सोडल्याने नदीचे प्रदूषण वाढत आहे. काही दिवसांपासून नदीत फेसाळ पाणी दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेचे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कार्यकारी अभियंता किशोर महाजन, कनिष्ठ अभियंता स्वामी जंगम यांनी चिखली आवारातील नदी पात्राची पाहणी केली. दरम्यान, केमिकलयुक्त सांडपाणी इंद्रायणी नदीत सोडणाऱ्या सहा कंपन्यांविरोधात चिखली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मारुती लोंढे यांची क्वालिटी कोटिंग वर्क्स, कुमार मोहन प्रजापतीची डायनॅमिक प्लास्टिक इंडस्ट्रीज, मोरेश्वर मुंगसे यांची ओम इंडस्ट्रीज, सचिन साठे यांची वरद इन्फोटेक, सुरेश अग्रवाल यांची हरिदर्शन प्रा. लि. आणि विश्वेश देशपांडे यांच्या टेक्सवी मेकॅनिकल कंपन्यांनी पाणीपुरवठा विभागाची कोणतीही परवानगी न घेता थेट मैलापाणीची जोडणी महापालिकेच्या ड्रेनेज लाइनला जोडल्याची माहितीही समोर आली आहे. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. तपासणीत महापालिकेच्या ड्रेनेज लाईनमध्ये आढळलेल्या लिकेजच्या दुरुस्तीचे कामही सुरू करण्यात आले. पुढील आठवड्यात परिसराची पुन्हा पाहणी केली जाणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ड्रेनेज लाईनला जोडणी करण्यापूर्वी नागरिक सुविधा केंद्रात नोंदणीकृत प्लंबरची परवानगी घ्यावी लागते. महापालिकेच्या ड्रेनेज लाईनमध्ये रासायनिक सांडपाणी टाकणे बेकायदेशीर आहे. या व्यावसायिकांना पर्यावरण कायद्यांतर्गत कोणतीही प्रक्रिया न करता सांडपाणी सोडल्याबद्दल पर्यावरण कायद्यांतर्गत नोटीस बजावण्यात आली आहे.
दरम्यान, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी या परिसराला भेट देऊन प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्यासाठी पावले उचलली आहेत. झोनल अधिकारी सीताराम बहुरे यांनी या उद्योजकांना अनधिकृत/परवाना नसलेल्या बांधकामानुसार सदर अनधिकृत बांधकाम हटविण्याची नोटीस बजावली आहे. इंद्रायणी नदीच्या पात्रात भराव टाकून अनधिकृत शेड व इमारतींचे बेकायदा बांधकाम सुरू असून, ही अनधिकृत बांधकामे, शेड उभारणाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात येणार आहे. तसेच बेकायदा बांधकामे पाडण्यात येणार आहेत. नागरिक, उद्योजकांनी कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम करू नये. बांधकाम करण्यापूर्वी रीतसर परवानगी घ्यावी, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सहायक शहर अभियंता रामदास तांबे यांनी दिला.