पिंपरी महापालिकेचे आवाहन
पिंपरी : केंद्र सरकारच्या वतीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशभरात स्वच्छ सर्व्हेक्षण मोहीम राबविण्यात येत आहे. या सर्व्हेक्षणात संबंधित शहरातील नागरिकांचा सहभाग असणे महत्वाचे आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील नागरिकांना या स्वच्छ सर्व्हेक्षण अभियानामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छता मुल्यांकनाचे सर्व्हेक्षण करण्याकरिता केंद्र शासनाचे शहरी विकास मंत्रालयाच्या आणि भारत गुणवत्ता परिषद यांचे पथक नुकतेच शहरात येऊन गेले. या पथकामार्फत सर्व्हेक्षण कामकाजासंबधी कागदपत्रांची छाननी, आरोग्य विषयक बाबींची स्थळ पाहणी करण्यात आली. त्या अनुषंगाने प्रश्नावली व मूल्यमापन अर्हता व निकषानुसार गुणांक ठरविण्यात आलेले आहे.
स्वच्छ सर्व्हेक्षण पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी 1969 या टोल फ्री क्रमांकावर मिस कॉल दिल्यास आपल्याला स्वच्छ सर्व्हेक्षण टीम यांच्याकडून कॉल आल्यानंतर आपण ज्या ठिकाणी राहतो. त्या ठिकाणाचा पिनकोड क्रमांक विचारला जाईल.
त्यानुसार आपल्या शहरातील पिनकोड क्रमांक दापोडी 411012, काळेवाडी 411017, पिंपरी 411018, चिंचवड पूर्व 411019, भोसरी-411026, चिंचवडगाव 411033 आकुर्डी-411035, भोसरीगाव 411039, पिंपरी -चिंचवड 411044, पिंपळे- गुरव 411061, तळवडे 412114, चिखली 411062 असे आहेत. नागरिकांनी आपल्या ठिकाणाचा पिन कोड टाकल्यानंतर आपल्याला आपल्या शहराच्या स्वच्छतेबाबत 6 प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहे. या प्रश्नावलीमध्ये नागरिकांना तुमचे शहर स्वच्छ सर्व्हेक्षणमध्ये सहभागी झाले आहे याची तुम्हाला माहिती आहे का? मागील वर्षापेक्षा यावर्षी तुम्हाला तुमचा परिसर स्वच्छ दिसतो का? यावर्षी, बाजारपेठामध्ये भागात कचराकुंडयांची संख्या वाढली आहे, असे तुम्हाला वाटते का? नगरपालिकेच्या प्रतिनिधींकडून तुमच्या घरामधून दारोदारी जाऊन कचरा संकलित केला जातो.
याबाबत यावर्षी तुम्ही समाधानी आहात काय? गतवर्षीच्या तुलनेने सार्वजनिक शौचालय, सामुदायिक शौचालयांच्या संख्येत वाढ झाली, असे तुम्हाला वाटत आहे का? सार्वजनिक शौचालय, सामुदायिक शौचालयांच्या साफसफाईमध्ये सुधारणा झाली आहे का? असे प्रश्न विचारणात येणार आहे.