शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

मुंबई – एलआयसी ऑफ इंडियाने देशभरात साडेसात हजारांहून अधिक पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यात एलआयसीने महाराष्ट्रात स्थानिक मराठी मुलांना प्राधान्य द्यावे, हिंदी भाषेची सक्तीची अट रद्द करून महाराष्ट्रात मुख्य परीक्षा मराठी भाषेत घ्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या आमदार व प्रवक्त्या डॉ. मनीषा कायंदे यांनी केली आहे. एलआयसी प्रशासनाने महाराष्ट्रात परीक्षेसाठी हिंदी भाषेची सक्ती केल्यास शिवसेना हा प्रयत्न हाणून पाडेल. तसेच एलआयसीच्या कार्यालयावर मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनीषा कायंदे यांनी दिला आहे. दक्षिण, पूर्व आणि ईशान्य भारतातील उमेदवारांना अशी सक्ती नाही, मग महाराष्ट्रातच एलआयसीचा हा दुजाभाव कशाला असा सवाल कायंदे यांनी केला आहे. महाराष्ट्रात 216 पदांसाठी घेण्यात येणाऱ्या मुख्य परीक्षेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना हिंदी भाषेची सक्ती करणे चुकीचे आहे. महाराष्ट्रात एलआयसीचे ग्राहकदेखील मोठया प्रमाणात मराठी वर्ग आहे. एलआयसीच्या वेबसाइटवरही विद्यार्थ्यांना स्थानिक भाषेचे किमान ज्ञान असणे आवश्यक असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यामुळे हिंदी भाषेत परीक्षा घेण्यात काहीच अर्थ नसल्याचे कायंदे म्हणाल्या.  महाराष्ट्रात परीक्षेसाठी एकूणच हिंदी भाषेची सक्ती एलआयसीने केली यावरून त्यांना मराठी भाषेचे वावडे असल्याची सडकून टीका कायंदे यांनी केली. एलआयसीने वेळीच ही चूक लक्षात घेऊन महाराष्ट्रातील मराठी मुलांवर अन्याय न करता परीक्षा मराठी भाषेतच घ्यावी. मराठी मुलांवर एलआयसीने हिंदी भाषेची सक्ती करून अन्याय केल्यास शिवसेना ते खपवून घेणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here