पिंपरी :- चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप हे दीड ते दोन लाखांच्या मताधिक्याने विजयी होणार, असा विश्वास शिवेसना खासदार श्रीरंग बारणे यांनी गुरूवारी (दि. १०) व्यक्त केला. तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रतारणा केलेल्या आणि शिवसेनेतून राष्ट्रवादीच्या मांडीवर गेलेल्यांना मतदारसंघातील मतदार निवडणुकीत थारा देणार नसल्याचेही ते म्हणाले.

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ रहाटणीतील कापसे लॉन्समध्ये आयोजित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, गौतम चाबुकस्वार, बाळा भेगडे यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

खासदार बारणे म्हणाले, महायुतीने गेल्या पाच वर्षांत केलेली कामे आणि घेतलेले निर्णय घेऊन आम्ही विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहोत. शहरातील नागरिकांनी राष्ट्रवादीची सत्ता असतानाचा काळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षांत केलेले काम आठवावे. पिंपरी-चिंचवड शहरात झालेली कामे पाहावीत. राष्ट्रवादी काँग्रेस चिंचवड आणि भोसरी मतदारसंघात उमेदवार सुद्धा देऊ शकले नाहीत. अजितदादांना दुसऱ्यांना मांडीवर घेऊन निवडणूक लढवावी लागत आहे, हे दुर्दैव आहे. या निवडणुकीत विरोधकांचे डिपॉझिट राहणार नाही. तीनही मतदारसंघात शिवसेना जीव ओतून काम करणार आहे. ही निवडणूक राज्याच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी होत आहे.

शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सक्षम आहेत. तीनही आमदारांनी सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका कायम घेतली आहे. अनेक न सुटलेले प्रश्न या तीनही आमदारांनी गेल्या पाच वर्षांत सोडविले आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी अजितदादांनी केवळ वल्गना केल्या होत्या. मात्र ते त्यांच्या राजकीय जीवनात ते उद्‌ध्वस्त झाले आहेत. शिवसेनेतून राष्ट्रवादीच्या मांडीवर गेलेल्यांना शहरातील मतदार थारा देणार नाही. आमदार लक्ष्मण जगताप यांचा चिंचवड मतदारसंघातून किती मताधिक्याने विजय होतो, याबाबत सर्वांना उत्सुकता आहे. जगताप हे दीड ते दोन लाखांपेक्षा जास्त मतांनी विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here