मुंबई – वाहन उद्योगातील मंदीचे ‘ग्रहण’ कायम असल्याचे चित्र समोर येत आहे. देशातील सर्वात मोठी कार उत्पादन करणाऱ्या कंपनीने सलग आठव्या महिन्यात उत्पादन घटविले आहे. चालू वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यात मारुती सुझुकीच्या १ लाख १९ हजार ३३७ वाहनांची विक्री झाली. तर गतवर्षी ऑक्टोबरमध्ये १ लाख ५० हजार ४९७ वाहनांची विक्री झाली होती.

गतवर्षी मारुती सुझुकीच्या १ लाख ४८ हजार ३१८ प्रवासी वाहनांची विक्री झाली होती. यंदा वाहन विक्रीचे प्रमाण कमी होवून १ लाख १७ हजार ३८२ वाहनांची विक्री झाली आहे. तर व्हॅनचे उत्पादन गेल्या महिन्यात सुमारे ५० टक्क्यांनी घटले आहे. गतवर्षी ऑक्टोबरमध्ये १३ हजार ८१७ व्हॅनची तर यंदा ७ हजार ६६१ व्हॅनची विक्री झाली आहे.

गेल्या वर्षी मध्यम प्रकारामधील वाहनांचे उत्पादन ऑक्टोबरमध्ये हे ३४ हजार २९५ एवढे होते. तर चालू वर्षातील ऑक्टोबरमध्ये २० हजार ९८५ वाहनांचे उत्पादन झाले आहे. यामध्ये एस-प्रेस्सो, अल्टो, जुनी वॅगनॉर आर या वाहनांचा समावेश आहे. कॉम्पॅक्ट सेगमेंटमध्ये नवी वॅगनॉरआर, स्विफ्ट अशा वाहनांचा समावेश आहे. कंपनीच्या जिप्सी, वितारा ब्रेझ्झा, एरटिगा, एक्सएल-६, एस-क्रॉस या वाहनांच्या विक्रीत किंचित वाढ झाली आहे. गतवर्षी या वाहनांची २२ हजार ५२६ वाहनांची विक्री झाली होती. यंदा या २२ हजार ७३६ वाहनांची विक्री झाली आहे.

सणादरम्यान मागणी झाल्याने वाहन विक्रीत सुधारणा झाली आहे. देशातील बाजारपेठेत मारुतीने ऑक्टोबर २०१९ मध्ये १ लाख ४४ हजार २७७ वाहनांची विक्री केली आहे. ही विक्री गतवर्षीच्या ऑक्टोबरच्या तुलनेत ४.५ टक्क्यांहून अधिक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here