निगडी – घरावर दगडफेक करून घराच्या काचा आणि मोटारसायकल फोडून नुकसान केले. तसेच घरातील लोकांना मारहाण केल्याप्रकरणी दहा जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 20) रात्री साडेआठच्या सुमारास ओटास्कीम निगडी येथे घडली.
भीमा वाघमारे, अर्जुन वाघमारे, विशाल वाघमारे, विक्की वाघमारे, मन्या हातागळे, विशाल क्षीरसागर, साद्या साळवे, विकास वाघमारे, दाद्या गवळी, धर्मराज वाघमारे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी बाबू गुरुनाथ भोसले (वय 32) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास आरोपी विशाल वाघमारे, विक्की वाघमारे, विशाल क्षीरसागर आणि साद्या साळवे या चौघांनी फिर्यादी बाबू यांच्या घरावर दगडफेक केली. त्यानंतर, आरोपी विकास, दाद्या, धर्मराज आणि मन्या यांनी बाबू यांच्या घराच्या खिडकीच्या काचा फोडल्या. दारात पार्क केलेल्या दुचाकींची तोडफोड करून नुकसान केले.
आरोपी भीमा वाघमारे याने त्याच्याकडील तलवारीने बाबू यांच्या वडिलांच्या पायावर वार केले. अर्जुन याने बाबू यांच्या हातावर लोखंडी कोयत्याने वार केले. अन्य आरोपींनी बाबू यांच्यासह त्यांची पत्नी व भावाच्या पत्नीला शिवीगाळ करत मारहाण केली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.