पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सन 2017 मध्ये होणार्‍या निवडणुकीची प्रभाग रचना करताना प्रभागांना नावे का दिली नाहीत,असा सवाल नंदकुमार सातुर्डेकर यांनी केला आहे. प्रभाग रचना करताना त्यात राजकीय हस्तक्षेप झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले. आता सातुर्डेकर यांनी प्रभागांना नावे न देण्यामागे कोणते राजकारण झाले, असा प्रश्‍न करत नव्या वादास तोंड फोडले आहे.

सातुर्डेकर यांनी यासंदर्भात एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. त्यात नमूद केले आहे की, महापालिका निवडणुकीत प्रभाग मोठे झाले आहेत. नवीन प्रभाग करताना विविध भागांचा समावेश करावा लागला आहे. त्यामुळे प्रभागांचे नाव देताना प्रश्‍न निर्माण होणे साहजिक आहे; मात्र याचा अर्थ पळ काढायचा, असा होत नाही. पुणे महापालिकेने प्रभागांना नावे दिली आहेत. बाणेर बालेवाडी पाषाण, वडगावशेरी कल्याणीनगर अशी नावे देऊन त्यांनी मार्ग काढला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेची प्रभाग रचना करताना आम्हाला हे का सुचले नाही, यामागे काय राजकारण आहे त्याचा खुलासा प्रशासनाने करावा, अशी मागणी सातुर्डेकर यांनी
केली आहे.
प्रभागांना नावे असली की, तो प्रभाग पटकन कळून येतो. आता प्रभागांना केवळ क्रमांक दिले असल्याने प्रभागाची ओळख राजकारण्यांपूरतीच मर्यादित राहील. शहरातील सामान्य माणसाला विशिष्ट क्रमांकाचा प्रभाग म्हणजे कोणता प्रभाग ते लक्षात येणार नाही. शहरातील विकासकामांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पारदर्शकरित्या पोहोचवायची असतील, तर प्रभागांना नावे दिली जावीत, अशी मागणी सातुर्डेकर यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here