पिंपरी :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नागरी विकास प्रकल्पांमध्ये नागरिकांना प्रभावीपणे सामील करून घेण्याच्या उद्देशाने व नागरिकांच्या समस्या जाणून घेवून सोडविण्यासाठी, सीइआर च्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या संवाद रथाचे उद्घाटन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात आज दुपारी करण्यात आले.
यावेळी स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी, विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, नगरसदस्या आशा धायगुडे-शेडगे, सहशहर अभियंता प्रविण तुपे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, सहाय्यक माहिती व तंत्रज्ञान अधिकारी अनिता कोटलवार, पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीचे महाव्यवस्थापक अशोक भालकर आदी उपस्थित होते.
महानगरपालिकेच्या गरजेनुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यशाळेच्या विद्यमान वाहनातून प्लस ट्रकची रचना करण्यात आली आहे. हे रीमॉडेलिंग फिनिक्स मार्केटसिटी,पुणे यांच्या Corporate Environment Responsibility (CER) कडून मिळालेल्या १७ लाख रुपयांच्या मदतीने करण्यात आले आहे. या रथामध्ये दोन सक्षम इंटरअॅक्टीव टच स्क्रिन आहेत. नागरिकांना सतत भेडसावणा-या अडचणींविषयी चर्चेकामी कार्य करणे हा या संवाद रथाचा उद्देश आहे. रथाच्या मदतीने नागरिकांच्या कच-याबाबतच्या समस्या जाणून घेऊन त्यांचेकडून उपाययोजनांबाबत संवाद साधण्यात येणार आहे. पथदर्शी या प्रकल्पाचा एक भाग म्हणून प्राधिकरणातील गंगानगर येथील सीमा हाऊसिंग सोसायटीमध्ये प्रोजेक्ट पल्सने जर्मनीच्या TU-Dresden येथील U-CODE टीमच्या सहकार्याने काम सुरु केले आहे. याअंतर्गत जर्मनी येथील श्री.डेव्हिड हिक, श्री.कॉन्स्टँटिन डॉल आणि श्री.सेबॅस्टियन विसेनह्यूटर यांनी नागरिकांकडून संकलित केलेल्या माहितीचे विश्लेषण केले. याअंतर्गत परिसरातील कचरा साठण्याच्या ठिकाणाचे रूपांतर वापरण्यायोग्य जागेत करण्यास मदत केलेली आहे. या दोन दिवसांच्या पथदर्शी प्रकल्पाच्या अंमलबजावणी दरम्यान 110 नागरिकांनी सहभाग घेतला होता आणि जवळजवळ 300Input संकलित केले होते. बेंच, झाडे, ओपन जिम, जॉगिंग ट्रॅक इत्यादी पूर्व परिभाषित 3D लायब्ररीतील वस्तूंचा वापर करुन नागरिकांच्या सार्वजनिक वापरासाठी डिझाईन्सचे स्केच तयार करण्यात आले. सीमा हाऊसिंग
सोसायटीच्या रहिवाश्यांसमवेत केंद्रित गट चर्चेच्या आधारे लायब्ररी Pulse Team ने तयार केली आहे. सदर वेब इंटरफेस अंकित महानोट आणि अंकित सभरवाल, बंगळुरू येथील सॉफ्टवेअर डेव्हलपर यांनी विकसित केलेली आहेत. पुढे जाऊन, संवाद रथाचा उपयोग पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध सह-निर्मिती कार्यक्रमांत नागरिकांचा सहभाग घेणेकामी केला जाईल. ट्रकचा योग्य त-हेने वापर होण्यासाठी टीम पल्स एक प्रकल्प अहवाल तयार करणार असून याद्वारे नागरिकांना शहरी विकासात सहभागी करुन घेण्यात येणार आहे. यावेळी संवाद रथाला १७ लाख रुपयांची आर्थिक मदत मदत केल्याबद्दल फिनिक्स मार्केट सिटी पुणेचे व्हाईस प्रेसिडेंट ज्ञानेश्वर कोटलवार, रामचंद्र व अय्याज पटेल यांचा महापौर उषा उर्फ माई ढोरे, स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी, विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या सत्कार करण्यात आला.