पिंपरी:- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली तसेच उच्च न्यायालय, मुंबई यांचे आदेश आणि पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरुन राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये दिवाणी / फौजदारी आणि तत्सम प्रलंबित तडजोड योग्य प्रकरणे, तसेच घरपट्टी, पाणीपट्टी संबंधातील प्रकरणी मा. न्यायालयामार्फत निवाडा करण्यात येतो.
विहित मुदतीत मिळकतकराचा भरणा न केल्यास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील अनुसूची ड प्रकरण ८ मधील नियम ४१ नुसार प्रती महा २ % दराने मनपा कर शास्ती आकारणेची तरतूद आहे. थकबाकीदार मिळकतधारकांकडून वर्षानवर्षे मिळकतकराचा भरणा होत नसल्याने मिळकतकराचे थकबाकीत दिवसेंदिवस वाढ होत आहे, अशी प्रकरणे तडजोडी करिता शनिवार, (दि. १४ / १२ / २०१९) रोजी सकाळी ११. ०० ते ५ .०० या वेळेत उर्दु माध्यमिक विद्यालय, आकुर्डी बसस्टॉप जवळ, पुणे – मुंबई रोड, आकुर्डी, पुणे येथे होणा-या लोकअदालतीमध्ये दाखल करणेत येणार आहे. लोकअदालती अंतर्गत तडजोडीकरिता एकूण ३. ७३३ इतक्या थकबाकीदार मिळकतधारकांना नोटीस / पत्र निर्गत करण्यात आलेली आहे.
लोक अदालतीचे दिवशी तडजोडीअंती थकबाकीसह संपूर्ण मिळकतकराची एक रक्कमी १०० % रक्कम भरलेनंतर भरणा दिनांकापर्यंत आकारणेत आलेल्या मनपाकराचे विलंब दंड रक्कमेचे ९० % सवलत तसेच थकबाकीसह संपूर्ण मिळकतकराची एक रकमी ५० % रक्कम भरलेनंतर भरणा दिनांकापर्यंत आकारणेत आलेल्या मनपाकराचे विलंब दंड रक्कमेचे ४५ % सवलत देण्यात येणार आहे. सदरील सवलत ही अवैध बांधकाम शास्ती करामध्ये नाही. वरील सवलत ही सर्व मिळकतधारकांसाठी आहे. तरी जे नागरिक या योजनेचा लाभ घेऊ इच्छितात त्यांनी वर नमूद ठिकाणी अथवा आपल्या नजीकच्या कर संकलन विभागीय कार्यालयात नमूद केलेप्रमाणे थकबाकीसह रक्कम भरावी.
वरील योजनेनुसार मिळणारी सूट ही केवळ लोक अदालतीच्या दिवशीच लागू आहे. तसेच या आर्थिक वर्षातील ही शेवटची सूट असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व मिळकतधारकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केले आहे.