कामगार नेते यशवंत भोसले यांची माहिती

पिंपरी :- राष्ट्रीय श्रमिक आघाडी (भारतीय जनता पार्टी प्रणित) या संघटनेच्या राज्यातील प्रमुख कामगार प्रतिनिधींचा येत्या रविवारी (दि.५) राज्यस्तरीय मेळावा होणार आहे. कामगारांचे प्रश्न, अधिकार, कामगारांचे भविष्य, कायमस्वरुपी काम, औद्योगिक, कामगार न्यायालयातील प्रलंबित खटले, निकालाची होत नसलेली अंमलबजावणी, कामगार चळवळीची केली जाणारी बदनामी अशा विविध प्रश्नांवर या मेळाव्यात चर्चा केली जाणार आहे. कामगारांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधले जाणार असून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील कामगारांना मार्गदर्शन करणार आहेत. याबाबतची माहिती राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे (भारतीय जनता पार्टी प्रणित) अध्यक्ष, कामगार नेते यशवंत भोसले यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

कासारवाडी येथे झालेल्या पत्रकार परिषदेला स्वानंद राजपाठक, मधुकरराव काटे, सोमनाथ विरकर, दिनेश पाटील, महेंद्र बावीस्कर, अमोल घोरपडे, करण भालेकर, कृष्णा शिकरे उपस्थित होते. संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता हा मेळावा होणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मुख्य मार्गदर्शक असणार आहेत. स्वागताध्यक्ष शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुण्याचे खासदार गिरीश बापट असणार आहेत. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरीच्या महापौर उषा ढोरे, खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, अॅड. सचिन पटवर्धन, सभागृह नेते एकनाथ पवार, सदाशिव खाडे, उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समितीचे सभापती विलास मडेगिरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

तसेच भाजपचे पश्‍चिम महाराष्ट्राचे विभागीय संघटन मंत्री रवी अनासपुरे, अमित गोरखे, अमर मुलचंदानी,  महेश कुलकणी, राजेश पिल्ले, उमा खापरे, नगरसेविका सुजाता पालांडे, माऊली थोरात, कुणाल लांडगे, सरचिटणीस प्रमोद निसळ, हेमंत तापकीर, राजू दुर्गे, संदिप भुटाला, संदिप खुर्डकर, प्रकाश बालवडकर उपस्थित असणार आहेत.

यशवंत भोसले म्हणाले, ”राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, वसई, नाशिक, नागपूर, चंद्रपूर, जळगाव, पंढरपूर, तुळजापूर, उस्मानाबाद, सावंतवाडी, कणकवली, रत्नागिरी, चिपळूण, अकोला, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, धुळे, नांदेड, बीड, उस्मानाबाद येथील संघटनेचे सर्व कामगार प्रतिनिधी जिल्हास्तरावरून बहुसंख्येने मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याच्या माध्यमातून कामगारांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधले जाणार आहे.

ते पुढे म्हणाले की, कामगार चळवळ, कामगारांच्या हिताला बाधा पोहचविणारी परिस्थिती निर्माण झाली आहे. कामगारांचा आर्थिक स्तर ढासळत आहे. कायमस्वरुपी नोकऱ्या मिळत नाहीत. कामगार संघटना संपुष्टात येत आहेत. श्रमिक संघ अधिनियमाखाली स्थापन करण्यात येणाऱ्या कामगार संघटनेचे अधिकार संपुष्टात येत आहेत. कामगार आयुक्त कार्यालय तसेच औद्योगिक आरोग्य व सुरक्षा संचालनालय यांचे अधिकार सिमित झाल्याने  बहुतांशी उद्योगपती कामगार कायदे पाळत नाहीत.

राज्यातील लाखो कामगारांचे भविष्य अंधारात येत आहे. कंत्राटी कामगार (नियमन व निर्मूलन) अधिनियम १९७० कायद्याचा सर्रास दुरूपयोग होत आहे. त्यामुळे सरकारच्या खात्यांपासून सर्वच उद्योगांमध्ये कायमस्वरूपी नोकरीच्या जागेवर कंत्राटी कामगारांचा सर्राससपणे तब्बल ९० टक्के जागेवर दुरूपयोग चालू झाला आहे. परिणामी, करोडो तरूण बेरोजगारीच्या विळख्यात अडकले आहेत.

औद्योगिक व कामगार न्यायालयातील वर्षोनुवर्षे चालणारे खटले प्रलंबीत आहेत. त्यानंतर न्याय मिळूनही निकालाची अंमलबजावणी होत नाही.  राज्यामध्ये एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात सुमारे ४० टक्के कुंटुंबीय हे कामगारांच्या वेतनावर अवलंबून आहेत. तर, ५० टक्के शेतकरी कुंटुंबीय आहे. लोकसंख्येच्या सरासरी ९० टक्के लोक हे कामगार व शेतकरी आहेत. तेच देशाचे व राज्याचे सरकार निवडून आणत आहेत. परंतु ते वंचित राहत आहेत.

कामगारांनी युनियन केलेस त्यांच्या विरूध्द खोट्या तक्रारी पोलिसात करून कामगार चळवळीला बदनाम केले जात आहे. निलंबित कामगारांची चौकशी कंपनीने नियुक्‍त केलेल्या चौकशी अधिकारी यांच्यामार्फत होऊ नये. त्याऐवजी सरकारच्या कामगार अधिकारी यांच्यासमोर चालाव्यात. तरच कामगारांना खरा न्याय मिळेल, अशा विविध प्रश्नांवर मेळाव्यात चर्चा केली जाणार असल्याचे, भोसले यांनी सांगितले. तसेच  राजकीय पक्षांच्या नेत्यांनी देखील कामगारांचे प्रश्न समजावून घ्यावेत.  त्यांच्या पाठीशी ठाम उभे रहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here