Chaupher News

दिल्ली : काँग्रेसकडून राज्यसभेच्या एका जागेसाठी राजीव सातव यांचं नाव निश्चित झालेलं आहे. या एका जागेसाठी मुकूल वासनिक, रजनी पाटील, सुशीलकुमार शिंदे यासह अनेक नावं चर्चेत होती. पण अखेर राहुल गांधींच्या विश्वासातले राजीव सातव यांच्याच नावावर मोहोर उमटली आहे.

राजीव सातव यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. सध्या ते गुजरातचे प्रभारी म्हणून काम पाहत आहेत. 2009 मध्ये ते कळमनुरी मतदारसंघातून आमदार, तर 2014 मधून हिंगोली मतदारसंघातून लोकसभेवर खासदार म्हणून निवडून गेले होते. काँग्रेसमध्ये राहुल आणि प्रियंका गांधी या दोघांच्याही विश्वासू गोटात असलेले जे मोजके नेते आहेत त्यात राजीव सातव यांचा समावेश होतो.

45 वर्षीय राजीव सातव हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (एआयसीसी) चे गुजरात प्रभारी आहेत, तर काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे निमंत्रक आहेत. राजीव सातव यांच्या मातोश्री रजनी सातव काँग्रेसच्या आमदार होत्या. शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडेंना पराभूत करुन राजीव सातव 2014 मधील लोकसभा निवडणुकीत हिंगोलीतून खासदारपदी निवडून आले होते.राजीव सातव यांच्या नेतृत्वात काँग्रेसने 2017 मधील गुजरात विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळवलं होतं. फेब्रुवारी 2010 ते डिसेंबर 2014 या काळात त्यांनी भारतीय युवा काँग्रेसचं अध्यक्षपदही भूषवलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here