चौफेर न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात आजपर्यंत कोरोनाचे 367 पॉझिटीव्ह रुग्ण सापडले होते. आजच्या तारखेला शहरातील 190 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी 130 जणांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह असूनही त्या रूगणांमध्ये कोरोनाची लक्षणे काहीच नाहीत. तर, फक्त सात रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे असून पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर वायसीएम, भोसरी तर काही जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज (सोमवारी) दुपार पर्यंतची ही माहिती आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा कहर सुरु आहे. दोन दिवसांपासून दिवसाला 40 च्या पुढे नवीन रुग्णांची नोंद होत आहे. दीड महिन्याच्या बाळांपासून सर्वच वयोगटातील नागरिकांना कोरोनाची बाधा होत आहे. त्यात सर्वाधिक युवकांना लागण झाली. त्यामध्ये एक चांगली गोष्ट म्हणजे रुग्णांचे कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही चांगले आहे. आजपर्यंत 170 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मृत्यूचे प्रमाणही कमी आहे. शहरातील सात जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह असलेल्या रुग्णांना महापालिका रुग्णालय, बालेवाडीतील कोरोना केअर सेंटरमध्ये देखरेखीखाली ठेवण्यात येत आहे.
सात पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आहेत. तर, कोरोना बाधित पाच रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर महापालिकेच्या वायसीएम आणि भोसरीतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
कोरोनाने सर्वाधिक युवकांना विळखा घातला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील 22 ते 39 वयोगटातील 146 युवकांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण होण्याचे सर्वाधिक प्रमाण युवकांना आहे. त्याखालोखाल 40 ते 59 वयवर्ष असलेल्यांना लागण होण्याचे प्रमाण आहे. या वयोगटातील 89 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर 13 ते 21 वयवर्ष असलेल्या 55 तरुणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच, 0 ते 12 वयवर्ष असलेल्या 42 लहान मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे. याशिवाय 60 वर्षापुढील 35 वृद्धांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.