चौफेर न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन शिक्षणाला अधिकाधिक प्रोत्साहन दिले जात आहे. देशातील महाविद्यालये आता आपले 40 टक्के अभ्यासक्रमांचे वर्ग ऑनलाइन घेऊ शकणार आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) सर्व विद्यापीठांना तशी मुभा दिली आहे. यापूर्वी 20 टक्केच अभ्यासक्रमांचे वर्ग ऑनलाइन घ्यावेत, अशा यूजीसीच्या सूचना होत्या.
ऑनलाइन वर्ग घेण्यासाठी ‘यूजीसी’ने काही मार्गदर्शक सूचनाही दिल्या आहेत. ऑनलाइन वर्ग जानेवारी ते जुलै या सत्रामध्ये घेण्यात येणाऱया वर्गांइतके असावेत, असे यूजीसीने म्हटले आहे. ऑनलाइन वर्ग घेण्यासाठी ‘स्वयं’ या प्लॅटफॉर्मचा वापर करावा, अशाही यूजीसीच्या सूचना आहेत. इतर वर्गांप्रमाणेच ऑनलाइन वर्गांनाही महत्त्व देण्यात यावे, असेही यूजीसीने स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे राज्यातील उच्च शिक्षणाचे धडे घेणाऱया विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.