चौफेर न्यूज – शाळा आणि संस्थाचालक हे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना जुमानत नाहीत, त्यामुळे शाळांवर कारवाई करण्यासाठी केवळ नोटिसा देऊन चालणार नाही, तर त्यासाठी शाळा मान्यतेच्या नियमावलीतील नव्याने सुधारणा करण्यात यावी, अशी मागणी सिस्कॉम संस्थेने शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव वंदना कृष्णा यांच्याकडे केली आहे.
या संदर्भात ‘सिस्कॉम’च्या शिक्षण प्रमुख वैशाली बाफना यांनी वंदना कृष्णा यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यात शाळांना मान्यता देताना अधिनियमातील कलम 12 (3) व कलम 18 (3) मध्ये मान्यता रद्द करण्याची कार्यपद्धती देण्यात आली आहे. एक किंवा त्यापेक्षा अधिक तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करण्याचे निर्देश त्यात देण्यात आले आहेत. या निर्देशाचा वापर करत शिक्षण विभागाला अनेक शाळांची मान्यता रद्द करता येते. मात्र, त्यासाठी अधिकारी मंडळी केवळ प्रस्ताव आणि नोटिसा देऊन वेळ घालवत असल्याचा आरोप बाफना यांनी निवेदनात केला आहे.
नवी मुंबई आणि मुंबईतील 7 शाळांच्या मान्यता रद्द करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने नोटिसा बजावल्यानंतरही त्या शाळांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शेवटी त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी शिक्षण उपसंचालकांना आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवावा लागला ही खेदाची बाब असल्याचेही बाफना यांनी नमूद केले आहे.
शिक्षण संस्थाचालकांना कायदा आणि त्याचा धाक उरला नाही. म्हणूनच शाळा मान्यतेच्या नियमावलीत सुधारणा करण्याची गरज आहे. या सुधारणा मध्ये जर शाळेची जागा त्यांच्या मालकीची किंवा दान म्हणून मिळाली असल्यास त्या शाळा व्यवस्थापनाच्या परवानगीने इतर इच्छुक संस्थेस चालवण्यास दिल्या जाव्यात. त्यासाठी स्थानिक प्राधिकरणाने त्यांचे निश्चित केलेले भाडे सुरुवातीलाच निश्चित केलेले असावे. शाळा व्यवस्थापन यासाठी मान्यता देत नसेल तर त्या शाळेतील नवीन प्रवेश प्रक्रिया बंद केली जावी.
शाळांची जागा भाडेतत्त्वावर असल्यास शासनाने प्रवेशित विद्यार्थ्यांची शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत त्या शाळेवर व्यवस्थापक नेमून शाळा चालवावी, यासाठी पालकांना शैक्षणिक वर्ष संपण्यापूर्वी सहा महिने अगोदर कल्पना द्यावी. एखाद्या शाळेची तक्रार येऊनही त्यासंदर्भात अधिकाऱ्यांनी दखल घेतली नसल्यास या प्रकरणाची सखोल चौकशी केली जावी, अशा अनेक सूचना शाळा मान्यतेच्या नियमावलीत सुधारणा करण्यासाठी सिस्कॉमच्या वतीने बाफना यांनी निवेदनाच्या माध्यमातून केल्या आहेत.