पिंपळनेर : स्वामी विवेकानंदांचे कार्य हे जगाला सर्व काळ प्रेरणा देणारे, कृतिशील विचारांचा आदर्शाचा खजिना आहे. त्यांनी सर्मपित भावना व राष्ट्रभक्तीच्या जोरावर जगाला नवा आयाम दिला. ही शक्ती फक्त युगपुरूषांकडेच असते. भारतीय जीवन शैलीत विज्ञानाची भक्ती ओतून हिंदू संस्कृतीची ओळख जगाला केवळ स्वामी विवेकानंद यांच्यामुळेच झाली. वाचन व सतत अभ्यास तसेच इतरांबद्दल सकारात्मक विचारांमुळे शक्य झाले, असे प्रतिपादन स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष अ‍ॅड. संभाजीराव पगारे यांनी केले.

वाचनालयाचा 23 वा वर्धापनदिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‍‍ॲड. संभाजीराव पगारे होते. कार्यक्रमात प्रमुख पाहूणे म्हणून प्रा.जयप्रकाश अमृतकर, विजयराव सोनवणो, अण्णा हरी नेरकर, जगन्नाथ शिरसाठ, झुलाल पगारे उपस्थित होते. ॲड. पगारे म्हणाले, वाचन संस्कृती ही जीवन जगायला शिकवते. वाचनाने मनाच्या कक्षा रूंदावतात व जगाच्या स्पर्धामध्ये सहभागी होण्यासाठीचे बळ मिळते.

मनावर संस्कार वाचनामुळे होतात. स्वामी विवेकानंद यांची ही जडणघडण सुसंस्कृत व सुसंस्कार वातावरण व वाचनाने झाली. जग बदलण्याची ताकद या युगपुरूषाकडे होती. सर्मपित भावना व प्रचंड इच्छाशक्ती याचे मूर्तीमंत एकमेव उदाहरण आहे. ज्ञान – विज्ञान व अध्यात्म याची निकोप सांगड घालून भारतीय संस्कृतीची ओळख करून दिली. त्यांचा आदर्श व कार्य भारतीयांसाठी मानदंड आहे, असे ही सांगितले.

वक्तृत्व स्पर्धेत मोठया गटातून प्रथम क्रमांक अश्विनी विजय सोनवणो, व्दितीय क्रमांक यशराज तुषार कोठावदे, तृतीय क्रमांक रूचिका पाटील तर उत्तेजनार्थ बक्षीस उत्पल गावित यांना देण्यात आले. लहान गटातून प्रथम क्रमांकाचे बक्षीस हर्षदा शेलार व्दितीय क्रमांकाचे बक्षीस निकीता पाटील, तृतीय क्रमांकाचे बक्षीस सविता आघाव तर उत्तेजनार्थ बक्षीस रूपाली चौधरी यांना देण्यात आले.

वक्तृत्व स्पर्धेत मोठया गटात सात तर लहान गटातून दहा नावांची नोंदणी झाली होती. यावेळी प्रमुख वक्ते प्रा.अमृतकर यांनी स्वामीजींच्या जीवनावर प्रकाशझोत टाकून विज्ञान व अध्यात्म यातून केलेल्या कार्याचे महत्व विशद केले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा.डी.टी पाटील,राजेंद्र गवळी व बी.एस कोठावदे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजयराव सोनवणो यांनी केले. सूत्रसंचालन प्रवीण पगारे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रंथपाल चेतन पगारे व घरटे यांनी परिश्रम घेतले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here