पिंपरी :- चिंचवड विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत हॅट्रिक साधण्याची किमया साधणारे पिंपरी-चिंचवडमधील पहिले आमदार आणि भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी सोमवारी (दि. २८) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. मुंबईतील वर्षा या निवासस्थानी ही भेट झाली.
आमदार जगताप यांच्यासोबत स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, भाजप शहर प्रवक्ते व सरचिटणीस अमोल थोरात होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार जगताप यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघात सलग तिसऱ्यांदा विजय मिळविला आहे. त्यामुळे लोकांमधून सलग तीनवेळा आमदार म्हणून निवडून आलेले जगताप हे शहरातील पहिले आमदार ठरले आहेत.
आमदार जगताप यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी रहाटणीत सभा घेतली होती. तसेच आमदार जगताप हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या गुडबुकमध्ये आहेत. त्यामुळे आगामी मंत्रिमंडळात आमदार जगताप यांचा समावेश असणार का?, याबाबत पिंपरी-चिंचवडकरांमध्ये उत्सुकता आहे.
या पार्श्वभूमीवर भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी सोमवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच आमदार जगताप यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना चांदीची गदा देऊन दुसऱ्यांदा सरकार स्थापनेस व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकी संदर्भात आमदार जगताप यांच्याशी चर्चा करून घडलेल्या राजकीय घडामोडींची माहिती घेतली. दरम्यान, आमदार जगताप आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीची सोशल मीडियावर चर्चाच चर्चा सुरू आहे.