Chaupher News
राष्ट्रीय नागरित्व नोंदणी अर्थात एनआरसीच्या समर्थनार्थ मनसेच्या मोर्चाच्या अपेक्षित मार्गाला मुंबई पोलिसांनी रेड सिग्नल दाखवला आहे. भायखळा ते आझाद मैदान या मार्गाऐवजी मरिन ड्राईव्ह ते आझाद मैदान या मार्गाचा वापर करण्याची सूचना पोलिसांनी केली आहे. येत्या रविवारी म्हणजेच 9 फेब्रुवारी रोजी एनआरसीच्या समर्थनार्थ मनसे मोर्चा काढणार आहेत.
मनसेने जिजामाता ते आझाद मैदान या मार्गावरुन मोर्चा काढण्याची परवानगी मागितली होती. मात्र इथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असं पोलिसांचं म्हणणे आहे. मोर्चाचा विरोध म्हणून हा मोर्चा काढला जात आहे. सीएए आणि एनआरसीविरोधातील भावना या परिसरातील नागरिकांच्या मनात जास्त आहे. हा मुस्लीमबहुल परिसर आहे. इथून हा मोर्चा निघाला तर अनुचित प्रकार घडू शकतो. या कारणामुळेच पोलिसांनी हा मनसेला हा मार्ग नाकारलेला आहे.
पोलिसांनी मनसेला मरिन ड्राईव्ह ते आझाद मैदान हा पर्यायी मार्ग सुचवलेला आहे. रझा अकादमीविरोधातील मनसेचा मोर्चाही मरिन ड्राईव्ह ते आझाद मैदान असाच होता. हाच मार्ग वापरावा, अशी सूचना पोलिसांनी मनसेला केलेली आहे. यासंदर्भात आता मनसेचे नेते पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चा करतील. सूत्रांच्या माहितीनुसार, मनसे हा मार्ग वापरेल. तसंच या मोर्चाची सुरुवात हिंदू जिमखाना इथून होईल. त्यानंतर पक्ष पोलिसांना माहिती देईल.