चौफेर न्यूज –  कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर देशातील काही भागांत शाळा सुरु करण्यास परवानगी असली तरी अजूनही ब-याच ठिकाणी शाळा बंदच ठेवण्यात आल्या आहेत. गेले वर्ष विद्यार्थ्यांनी शाळेविना काढले असले तरी आता मात्र त्यांना शाळेत जाऊन शिक्षण घेण्याचे वेध लागले असल्याचे जगातील सर्वात मोठा लर्निंग प्लॅटफॉर्म ब्रेनलीने केलेल्या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे. सर्वेक्षणात सामील झालेल्या विद्यार्थ्यांपैकी ६९% विद्यार्थ्यांना नियमितपणे किंवा हायब्रिड मॉडेलनुसार शाळेत जायचे आहे. शैक्षणिक मुद्द्यांवरील भारतीय विद्यार्थ्यांच्या मन:स्थितीचा सखोल आढावा घेण्याच्या उद्देशाने ब्रेनलीने सर्वेक्षण केले होते. यात देशभरातील ३१०५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

२०२१ या वर्षाची नुकतीच सुरुवात झाली असून बहुतांश विद्यार्थ्यांनी मागील वर्ष कसे गेले, हे सांगितले तसेच धोरणात्मक उपाययोजना आणि इतर संबंधित मुद्द्यांवर मते मांडली. विशेष म्हणजे शिक्षणात मोठ्या प्रमाणावर बदल झाल्यानंतरही फक्त १९.८% सहभागींनी २०२० हे वर्ष त्यांच्या शैक्षणिक कामगिरीवर नकारात्मक परिणाम करणारे ठरले असे म्हटले. १२.३% विद्यार्थ्यांनी त्यांच्या कामगिरीवर काही परिणाम झाला नसल्याचे म्हटले. तर २३.५% विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासावर संमिश्र परिणाम झाल्याचे सांगितले. तथापि, ४४.४% ब्रेनलीच्या विद्यार्थ्यांनी २०२० हे वर्ष त्यांच्या शैक्षणिक कामगिरीवर सकारात्मक परिणाम करणारे ठरल्याचे सांगितले.

या सकारात्मक परिणामांचे कारण म्हणजे विद्यार्थ्यांनी पर्यायी दृष्टीकोन स्वीकारला. २६.७% विद्यार्थ्यांनी त्यांचा अभ्यास प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्मची वाट धरली. २५.३% विद्यार्थ्यांनी ऑनलाइन क्लासेससह होम ट्युशन्स केल्या तर १९.८% विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कारणासाठी समर्पित डिव्हाइसदेखील (उदा. लॅपटॉप, स्मार्टफो, टॅब इत्यादी) खरेदी केले. २८.७% विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासासाठी पालकांची मदत घेतली.

या सकारात्मक बदलांमध्ये ५७% ब्रेनलीच्या विद्यार्थ्यांनी दावा केला की, ते नियमितपणे व्यायाम व ध्यान करतात. त्यापैकी ४३% विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत जाऊन शिक्षण घ्यायचे आहे. तर दुसरीकडे २६.१% विद्यार्थ्यांना ‘फ्लेक्झीबल आणि हायब्रीड लर्निंग मॉडेल’ मध्ये रस होता. सर्वेक्षणातील १४.५% विद्यार्थ्यांनी ऑनलाइन शिक्षण सुरु ठेवण्याची इच्छा व्यक्त केली.

मागील वर्षी, परीक्षा ही विद्यार्थ्यांसाठी एक त्रासदायक बिंदू ठरली. कारण ४५.७% विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षा अधिक आव्हानात्मक असल्याचे म्हटले. तर ३०.५% विद्यार्थ्यांनी त्या नियमित परीक्षांप्रमाणेच असल्याचे सांगितले. २३.८% विद्यार्थ्यांनी यायबाबत मत व्यक्त करणे कठीण असल्याचे म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here