चौफेर न्यूज
– सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनच्या (सीबीएसई) देशभरातील दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे १९ लाख आहे. महाराष्ट्रातील एकट्या एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांची संख्या तब्बल १६ लाख आहे. सीबीएसई बोर्डाला प्रवेश घेणारा वर्ग वेगळा आहे.
तो एसएससी बोर्डाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा खूप कमी आहे. त्यामुळे केवळ एका राज्यातील १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना कोणत्याही मूल्यमापनाशिवाय म्हणजेच परीक्षेविना उत्तीर्ण करणे उचित ठरणार नाही, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द केल्या. परंतु, अजमेर, भुवनेश्वर, पंचकुला, दिल्ली ईस्ट, गोहाटी, चेन्नई ,पाटणा, प्रयागराज, त्रिवेंद्रम, डेहराडून, चंदीगड, पुणे, बेंगलोर, भोपाळ आणि दिल्ली वेस्ट या विभागांतून २०२० मध्ये दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या
१९ लाख ४ हजार ७७२ एवढी होती. त्यात सीबीएसई बोर्डाच्या पुणे विभागातून केवळ ७६ हजार १७९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.
सीबीएसई बोर्डाने अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्याचे घोषित केले आहे. परंतु, एसएससी बोर्डाच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या पद्धतीबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जातात. त्यामुळेच दोन वर्षांपूर्वी राज्य शासनाने अंतर्गत ‘गुणदान’ बंद केले होते. परिणामी परीक्षा न घेता एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे उचित होणार नाही.
त्यामुळे कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतर दहावी-बारावीच्या लेखी परीक्षा घ्याव्यात, असे मत शिक्षणतज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.