भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान संविधान समितीने २६ नोव्हेंबर, इ.स. १९४९ रोजी स्वीकारले व २६ जानेवारी इ.स. १९५० रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आले. जवाहरलाल नेहरू यांनी ३१ डिसेंबर, इ.स. १९२९ रोजी लाहोरजवळ रावी नदीच्या काठी तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची (स्वातंत्र्याची) घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला. या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते. भारताचे राष्ट्रगीत म्हटले जाते आणि आदर व्यक्त केला जातो. हा दिवस आपल्या देशातील सुवर्ण दिन आहे. या दिवसाची प्राप्ती हजारो देशभक्तांच्या बलिदानातून झाली होती. या दिवशी शाळा महाविद्यालयांमध्ये भाषणाचे आयोजित केले जाते.
- इतिहास
भारताला या ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा स्वातंत्र्य लढा आणि त्यातील महात्मा गांधी यांच्या अहिंसा पद्धतीचा मोठा सहभाग आहे. तेव्हा स्वतंत्र भारताला स्वतःचे संविधान नव्हते. भारताचे मात्र कायदे हे भारतीय राज्य शासनाच्या १९३५ सालच्या कायद्यावर (कलमावर) आधारित होते.
२९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यासाठी मसूदा समिती स्थापना केली गेली. या समितीने संविधानाचा मसुदा तयार करून तो सभेपुढे ४ नोव्हेंबर १९४७ रोजी सादर केला. या सभेने सार्वजनिक चर्चेसाठी सभागृहात हा प्रस्ताव १६६ दिवसांसाठी खुला केला आणि २ वर्ष,११ महिने आणि १८ दिवसाच्या कालावधी नंतर समितीने हा मसुदा अंतिम केला. बरेचसे विचार विमर्श आणि सुधारणा केल्यानंतर समितीच्या ३०८ सद्स्यांनी दोन हस्तलिखित प्रती (हिंदी आणि इंग्रजी) २४ जानेवारी १९५० रोजी स्वाक्षरांकित केल्या. दोन दिवसानंतर हे भारताचे संविधान संपूर्ण राष्ट्रासाठी लागू करण्यात आले. भारताच्या संविधानाच्या निमित्ताने भारताचा प्रजासत्ताक दिन हा साजरा करण्यात येऊ लागला. - उत्सव
दर वर्षी २६ जानेवारी रोजी भारताच्या राजधानीत, म्हणजे नवी दिल्ली येथे, एक मोठे संचलन आयोजित केले जाते.हे संचलन रायसीना हिलपासून राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथ मार्गाद्वारे जाते. संचलनाच्या अगोदर अनाम सैनिकांसाठी बनवले गेलेले स्मारक, अमर जवान ज्योती, येथे भारताचे पंतप्रधान पुष्पचक्र अर्पण करतात. भारतासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या वीर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात येते. त्यानंतर पंतप्रधान राजपथाच्या मुख्य मंचावर जातात व आलेल्या पाहुण्यांना भेटतात. तितक्यात प्रमुख पाहुण्यांसोबत राष्ट्रपतींचे आगमन होते. राष्ट्रगीत सुरू होताच राष्ट्रपती ध्वजारोहण करतात व २१ तोफांची सलामी दिली जाते. त्यानंतर देशासाठी शौर्य गाजवलेल्या सैनिकांना राष्ट्रपतींच्या हस्ते अशोक चक्र आणि कीर्ती चक्र, हे मुख्य पुरस्कार देण्यात येतात. राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेली देशातील शूर बालके सजवलेल्या हत्तीवरून किंवा वाहनावरून या संचलनात सहभागी होतात.प्रमुख पाहुणे म्हणून परराष्ट्रीय राष्ट्राध्यक्षांना निमंत्रण दिले जाते. - भारतीय फौजांचे (नौदल, पायदल, वायुसेना) वेगवेगळे सेनाविभाग, घोडदळ, पायदळ, तोफखाना आणि इतर अद्ययावत शस्त्रे/ क्षेपणास्त्रे (जसे पृथ्वी, अग्नी), रणगाडे समवेत संचलन करतात. भारताचे राष्ट्रपती या फौजांची मानवंदना स्वीकारतात. या संचलनाच्या सादरीकरणाची पूर्वतयारी विशेष काळजीपूर्वक आणि शिस्तीने केली जाते इतके या संचलनाचे महत्त्व आहे. नवी दिल्ली येथे होणाऱ्या संचलनाप्रमाणेच भारतातील सर्व राज्यांतही एकेक संचलन होते. प्रत्येक राज्यात त्या त्या राज्याचे राज्यपाल फौजांची मानवंदना स्वीकारतात. बीटिंग रिट्रीट या कार्यक्रमाने प्रजासत्ताक दिन सोहळ्याची सांगता केली जाते.
- राष्ट्रीय सुट्टी
२६ जानेवारी हा राष्ट्रीय समारंभ असल्यामुळे त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. २६ जानेवारी, इ.स. १९५० रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधान अंमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. प्रजासत्ताक दिवस भारतातील तीन राष्ट्रीय सुट्ट्यांपैकी एक आहे. (इतर दोनः स्वातंत्र्य दिन (१५ ऑगस्ट) व गांधी जयंती (२ ऑक्टोबर)). ह्या दिवशी भारताची राजधानी, नवी दिल्ली येथे एक मोठी परेड (संचलन) राजपथ मार्गावरून निघते. - चित्ररथ
या संचलनाबरोबरच भारतातील विविध संस्कृतींची झलक प्रस्तुत केली जाते. त्यासाठी भारतातील राज्यांनी आपापल्या राज्याचे चित्ररथ पाठविलेले असतात. त्यांमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथही असतो. या चित्ररथांच्या सादरीकरणाची विशेष पूर्वतयारी सर्व राज्यांचे कलाकार काही दिवस आधी करतात. या चित्ररथ सादरीकरणाला विशेष पारितोषिकही दिले जात असल्याने प्रत्येक राज्य आपापल्या संस्कृतीचे दर्शन अधिक चांगल्या पद्धतीने चित्ररथात दिसून येईल यासाठी प्रयत्न करते. - ध्वजवंदन
भारतातील सर्व शाळा आणि महाविद्यालये तसेच शासकीय संस्था, खाजगी संस्था, ग्रामपंचायती अशा विविध ठिकाणी २६ जानेवारी रोजी ध्वजवंदन केले जाते आणि भारतीय संविधानाप्रती आदर व्यक्त केला जातो. - विशेष संचलन
स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या उपस्थितीत १९५० साली राजधानी दिल्ली येथे राजपथावर पहिले संचलन आयोजित करण्यात आले होते.[१८] भारताच्या विविधतेतून एकता या वैशिष्ट्याला ही मानवंदना होती. २०१६ साली ६७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासननाच्या शिष्ट समितीतर्फे मरीन द्राइव्ह येथेही एक संचलन आयोजित करण्यात आले. - संदेश व शुभेच्छापत्रे
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी देशभक्तीपर गीतांच्या ओळी, तिरंगा ध्वज आदि संकल्पनांचा कल्पक वापर करून परस्परांना शुभेच्छा दिल्या जातात. देशाभिमान मनात टिकून राहण्यासाठी भारतीय नागरिक अशा शुभेच्छा एकमेकांना देऊन परस्परांमधले ऐक्य टिकवून ठेवण्याचे आवाहनही करतात.