पिंपरी – निगडी येथील साहिल विजय बिरजे यांची भारतीय संरक्षण दलात कमिशन ऑफिसर लेफ्टनंट पदावर नियुक्ती झाली आहे. त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
साहिल यांचे शालेय शिक्षण हे देहूरोड येथील केंद्रीय विद्यालयात झाले आहे. त्यांचे लहानपणापासून लष्करात भरती होण्याचे स्वप्न होते. यासाठी त्यांनी एनडीएची लेखी व मुलाखतीचे शिक्षण स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ येथून घेतले. त्यासाठी त्यांना बलजितसिंग गील व ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांचे मार्गदर्शन लाभले. त्यात ते उत्तीर्ण झाले. त्यांनी या प्रशिक्षणाच्या जोरावर परिक्षेमध्ये देशात ५८ वा क्रमांक मिळवून एनडीएच्या १४१ व्या तुकडीत प्रवेश मिळवला होता.
त्यानंतर बिरजे यांनी परत कधी मागे वळून पाहिले नाही. त्यांचे पुढील प्रशिक्षण हे इंडियन मिलिटरी अकॅडमी डेहराडून येथे झाले. साहिल यांच्या घरात मिलीटरीचा कोणताच वारसा नाही. वडील व्यावसायिक असून आई गृहिणी आहेत. घरच्यांनी दिलेली साथ आणि जिद्दीच्या जोरावर ते संरक्षण दलात मोठ्या हुद्द्यावर पोहचले आहेत.