श्रद्धेय पब्लिक स्कूल, बालेवाडीने पटकावला ‘मेस्टा’चा उत्कृष्ट शाळेचा पुरस्कार!
पुणे: महाराष्ट्र इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशनच्या राज्यस्तरीय अधिवेशनात बालेवाडी येथील श्रद्धेय पब्लिक स्कूलने पुणे जिल्ह्यातील उत्कृष्ट पब्लिक स्कूलचा मानाचा पुरस्कार आपल्या नावे केला आहे. मुंबई येथे मेस्टाचे अध्यक्ष संजय तायडे यांच्या हस्ते मुख्याध्यापिका ज्योती कुलकर्णी, प्रशासकीय अधिकारी दिव्या दीक्षित आणि ज्येष्ठ शिक्षिका अर्चना ब्रह्मनकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
श्रद्धेय पब्लिक स्कूल विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक विकासासाठी नेहमीच अग्रेसर राहिली आहे. शाळेतील विद्यार्थी उत्कृष्ट शिक्षण आणि उत्तम संस्कारांच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्याची वाटचाल करत आहेत. श्रद्धेय पब्लिक स्कूल, बालेवाडी हे निसर्गरम्य वातावरणात विद्यार्थ्यांसाठी एक उत्कृष्ट शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखले जाते. येथे प्रशिक्षित आणि तज्ञ शिक्षक विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देतात. भारतीय संस्कृती आणि आधुनिक शिक्षण पद्धतीचा योग्य समन्वय साधून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे हे शाळेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
शाळेच्या प्रशस्त क्रीडांगणावर विद्यार्थ्यांसाठी विविध खेळांची सोय उपलब्ध आहे. दर्जेदार शिक्षण, सुरक्षित वातावरण, उत्कृष्ट संसाधने आणि अभ्यासेतर उपक्रमांवरील लक्ष यामुळे श्रद्धेय पब्लिक स्कूलने शिक्षण क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. विद्यार्थ्यांच्या क्षमता विकासासाठी शाळेत नियमितपणे विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. जागतिक स्तरावर यशस्वी होणारे विद्यार्थी घडवण्यावर शाळेचा विशेष भर असतो.
श्रद्धेय पब्लिक स्कूलला ‘मेस्टा’चा उत्कृष्ट शाळेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि सर्व शिक्षक-शिक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे. हा पुरस्कार शाळेच्या उत्कृष्ट शैक्षणिक कार्याचा आणि समर्पित प्रयत्नांचा गौरव आहे, असे मत मुख्याध्यापिका सौ. ज्योती कुलकर्णी यांनी व्यक्त केले.