रस्त्यावर सुरक्षितता, समान हक्क मिळण्यासाठी इंडो अथलेटिक्स सोसायटीचे आंदोलन
पिंपरी : येथील हर्षद पिंगळे यांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरलेल्या व्यक्तीस योग्य ते शासन होण्यासाठी आणि अशा चालकाकडून होणार्या त्रासास आळा बसन्याकरिता इंडो एथेलेटिक्स सोसायटीमार्फत पौड पोलिसांना निवेदन देण्यात आले. तसेच, सुरक्षित व समान हक्क मिळण्यासाठी आयएएसतर्फे आंदोलन करण्यात आले.
यावेळी गणेश भुजबळ, अजीत पाटील, गिरिराज उमरीकर, अजित गोरे, अमित पवार, मदन शिंदे, विजय गायकवाड, संतोष नखाते, प्रदीप टाके, हरिप्रिया, दीपक बुरकुल, श्रीकांत चौधरी, अभय खटावकर, शैलेश पाटील, संदीप परदेशी, रमेश माने, मारुती विधाते, श्रेयस पाटील, विवेक कडु, अंजली खटावकर, निलेश टकले यांनी पुणे विद्यापीठ ते पौड पोलीस स्टेशन सायकल मार्चचे नेतृत्व केले. यामध्ये, पिंगळे कुटुंबातील सदस्यांसह शहरातील ५०० सायकलिस्ट धावपटू या आंदोलनात सहभागी झाले होते.
बुधवार, दि. 16 ऑगस्ट 2023 रोजी हर्षद पिंगळे हे नेहमी प्रमाणे स्वतः च्या शरीरस्वस्थसाठी मॉर्निंग वॉक करीत असताना त्यांना भूगाव दरम्यान अनोळखी वाहनाने धडक दिली. पिंगळे यांची मदत न करताच सदर वाहन चालक तेथून पसार झाला. या अपघातात हर्षद पिंगळे गंभीर जखमी होवून त्यांचा मृत्यू झाला.
अशा अनेक घटना सर्रास घडत आहेत. या प्रवृत्तीना आळा बसणे व संबधित वाहन चालकास योग्य ती शिक्षा व्हावी, पिंगळे यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा. भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत, म्हणून उत्तेजक द्रव्य तपासणी, नियमबाह्य़ चालक तपासणी अशा गोष्टी सुरू करण्यासाठी पोलिसांना निवेदन देण्यात आल्याचे आयएएसचे संस्थापक सदस्य अजित पाटील यांनी सांगितले.
महानगरांमध्ये आजकाल सर्रास असे प्रकार घडत आहेत. सकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात सायकल स्वार व रनर ची संख्या वाढली आहे. पण त्यांच्या सुरक्षिततेबाबत कोणत्याही प्रकारची प्रशासनाकडून काळजी घेण्यात येत नाही. त्यांच्यासाठी सुरक्षित असे इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध नाही , एका बाजूला आपण प्रदूषण मुक्त शहरांचे स्वप्न पाहत आहोत. परंतु सायकल फ्रेंडली इन्फ्रास्ट्रक्चर बाबत कोणत्याही प्रकारची पावले उचलण्यात येत नाही, असे आयएएसचे संस्थापक सदस्य गणेश भुजबळ म्हणाले.
मागील वर्षामध्ये अशाप्रकारे रस्त्यावर पाच ते दहा व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला आहे. हर्षद पिंगळे अतिशय मनमिळावू अभियंता होता. त्याच्या डोक्याला इजा होऊन देखील त्याच्या मृत्यूचे खरे कारण शोधण्यासाठी टाळाटाळ होत आहे. खरे कारण लवकरात लवकर पुढे यावे, दोषी व्यक्ती वर कडक कारवाई करण्यात यावी. सर्वांच्या न्याय हक्कासाठी आयएएस संघटना रस्त्यावर उतरेल, असा इशारा देखील संघटनेतर्फे देण्यात आला.
शहरामध्ये व हायवेवर मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे चालू आहेत. त्यावर आत्ताच ऍथलेट लोकांसाठी स्वतंत्र ट्रॅक उपलब्ध व्हावेत, अशी मागणी करणारे महानगरपालिकेच्या माध्यमातून वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला आहे. परंतु त्याचे कोणत्याही प्रकारचे दखल घेतली जात नाही. त्यामुळे यापुढे राज्य सरकारला व केंद्रीय समितीला देखील या संदर्भात निवेदन संस्थेतर्फे करण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे.