पिंपरी, – महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग आणि पिंपरी-चिंचवड महापालिका, प्रतिभा महिला प्रतिष्ठान, चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या संयुक्त विद्यमाने नवी सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानात शनिवारी २४ आणि रविवार २५ डिसेंबर असे दोन दिवस अटल महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराचे राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शनिवारी सकाळी ९ वाजता उद्घाटन होणार आहे. या शिबीरात सर्व आजारांच्या तपासण्या, मार्गदर्शन, उपचार आणि शस्त्रक्रिया मोफत होणार आहेत. शिबीरात मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील नामांकित रुग्णालये सहभागी होणार आहेत. तसेच तज्ज्ञ डॉक्टर रुग्णांची मोफत तपासणी करणार असून, शस्त्रक्रियाही मोफत केली जाणार आहे. हे शिबीर दरवर्षी आयोजित केले जाते. त्यात कोरोना संकटामुळे खंड पडले होते. शिबीराचे हे चौथे वर्ष आहे, अशी माहिती शिबीराचे आयोजक व भाजपचे चिंचवडे विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांनी दिली.
२४ आणि २५ डिसेंबर असे दोन दिवस सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत हे विनामूल्य अटल महाआरोग्य शिबीर होणार आहे. शिबीराच्या उद्घाटनाला भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, माजी महापौर माई ऊर्फ उषा ढोरे, पुण्याचे सहधर्मादाय आयुक्त डॉ. सुधीरकुमार बुक्के, उपआरोग्य संचालक डॉ. राधाकृष्ण पवार, कॅम्प नियोजक डॉ. धर्मेंद्र कुमार, औंध ऊरो रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ली, ह्दय प्रत्यारोपण सर्जन डॉ. मनोज दुराईराज, वायसीएम रुग्णालयाचे डॉ. राजेंद्र वाबळे, सहआरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, ह्दयरोग तज्ज्ञ डॉ. अभिजीत पळशीकर, मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयाचे बालरोग तज्ज्ञ पंकज सुगांवकर, सर्वोत्कृष्ट नेत्रतज्ज्ञ डॉ. विश्वास डाके यांच्यासह अनेक तज्ज्ञ डॉक्टर, शहरातील भाजपचे सर्व माजी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित असतील.
गरीब आणि गरजू रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांपर्यंत पोहोचणे शक्य नसते. शस्त्रक्रिया किंवा औषधोपचाराचा खर्चदेखील मोठा असल्याने बऱ्याचदा खर्चिक आजार अंगावर काढला जातो. परिणामी रुग्णाला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते. अशा रुग्णांवर मोफत औषधोपचार किंवा शस्त्रक्रिया करण्यासाठी या अटल महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील हे सर्वात मोठे महाआरोग्य शिबीर ठरणार आहे. या शिबीरात अनेक तज्ज्ञ डॉक्टर्स एकाच दिवशी, एकाच ठिकाणी रुग्णसेवेसाठी उपलब्ध होणार आहेत. किरकोळ किंवा गंभीर स्वरुपाचा आजार असलेल्या पिंपरी-चिंचवडच नाही तर महाराष्ट्राच्या कोणत्याही भागातील जास्तीत जास्त रुग्णांनी या मोफत अटल महाआरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक व भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांनी केले आहे.
या आजारांवर होणार मोफत उपचार, मार्गदर्शन व शस्त्रक्रिया
या शिबीरात ह्दयरोग शस्त्रक्रिया व प्रत्यारोपण, किडनी विकार व प्रत्यारोपण, कॉकलर इन्प्लान्ट, लिव्हर प्रत्यारोपण, गुडघे प्रत्यारोपण, हाडांचे व मणक्यांचे आजार, हिप प्रत्यारोपण, कॅन्सर शस्त्रक्रिया व केमोथेरपी, प्लास्टिक सर्जरी, दंतरोग, नेत्ररोग, बालरोग व शस्त्रक्रिया, मेंदूची शस्त्रक्रिया, आयुर्वेदिक उपचार, मूत्र मार्गाचे विकार, त्वचा विकार, फाटलेली टाळू व ओठांवरील शस्त्रक्रिया, बॉडी चेकअप, एपिलीप्सी-फिट येणे, कान-नाक-घसा या अवयवांशी संबंधित विकार व शस्त्रक्रिया, अनियमित रक्तदाब आणि शुगर तपासणी, किशोरवयीन मुलींचे समुपदेशन, गरोदर मातांची तपासणी, स्त्री रोग, हिमोग्लोबिन तपासणी, लहान बालकांच्या हृदयामधील छिद्राची शस्त्रक्रिया, मोफत एन्जीओग्राफी, आयुर्वेदिक न्युरोथेरपी, आयुर्वेद, योगा, नॅकोपॅथी, उनानी सिद्धा, होमिओपॅथी, कायरोपॅक्ट्रीक थेरपी तसेच सर्व आजारांवर आयुष्यमान भारत व महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत पात्र लाभावर मोफत उपचार व शस्त्रक्रिया, त्याचप्रमाणे अपंगांना जयपुर फुट व कॅलीपर्सचे मोफत वाटप, चष्म्यांचे मोफत वाटप आणि श्रवणयंत्रांचे मोफत वाटप केले जाणार आहे.
शिबीरात हे हॉस्पिटल सहभागी असतील
शिबीरात ससून हॉस्पिटल, जिल्हा ऊरो रुग्णालय, वायसीएम रुग्णालय, मुंबईतील टाटा मेमोरिअल हॉस्पिटल, मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल, आदित्य बिर्ला हॉस्पिटल, जहांगीर हॉस्पिटल, दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल, संचेती हॉस्पिटल, डेक्कन हर्डीकर हॉस्पिटल, रूबी हॉल क्लिनीक, पूना हॉस्पिटल, भारती हॉस्पिटल, इन्लॅक्स बुधराणी के. के. इन्स्टिट्यूट, एच. व्ही. देसाई हॉस्पिटल, व्हिजन नेक्स्ट फाउंडेशन, डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल, लोकमान्य हॉस्पिटल (चिंचवड), एम्स हॉस्पिटल, सिंबायोसिस युनिव्हर्सिटी हॉस्पिटल, एमआयएमईआर मेडिकल कॉलेज आणि डॉ. बीएसटीआर हॉस्पिटल, श्रीमती काशीबाई नवले हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज, इंद्रायणी कॅन्सर हॉस्पिटल, रूबी एल केअर सर्व्हिस लिमिटेड, देवयानी हॉस्पिटल (कोथरूड), ओम हॉस्पिटल (भोसरी), श्री हॉस्पिटल क्रिटीकेअर आणि ट्रॉमा सेंटर, कोहाकडे हॉस्पिटल, सनराईज मेडिकल फाउंडेशन, आयुर्वेदिक न्युरोथेरपी, नारायण धाम, नॅशनल आयुष मिशन (एन.ए.एम), स्टर्लिंग हॉस्पिटल, सूर्या मदर अँड चाइल्ड सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल, ज्युपिटर हॉस्पिटल, अकॉर्ड हॉस्पिटल मोशी, आयुर्वेदा रुग्णालय आणि स्टर्लिंग हॉस्पिटल, डॉ. अगरवाल डोळ्यांचा दवाखाना आदी रुग्णालये सहभागी होत आहेत. तसेच त्या त्या रुग्णालयांचे नामांकित डॉक्टरही उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, या शिबीरासाठी रुग्णांना https://healthcamp.site या वेबसाईटवर ऑनलाइन नाव नोंदणी करता येईल. याशिवाय 7507411111 किंवा 7575981111 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून नाव नोंदणी करता येईल. हे शिबीर केवळ तपासणी करण्याकरीताचे शिबीर नसून रुग्णाला बरा होईपर्यंत उपचार करण्यात येणार असल्याचे शिबीराचे आयोजक तसेच भाजपचे चिंचवडे विधानसभा निवडणूक प्रमुख व माजी नगरसेवक शंकर जगताप यांनी सांगितले. या शिबीराचा जास्तीत जास्त रुग्णांनी व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.