पिंपरी : केंद्र, राज्य सरकार व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने चिखली-स्पाईन रोड येथे आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांसाठी 160 इमारतीचे घरकुल बांधले. पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वात मोठ्या सहकारी गृहसंस्थाचा एकत्रित फेडरेशन ऑफ घरकुल सहकारी गृहरचना संस्था मर्यादित स्थापन करण्यात आली आहे. तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आरोग्य (ओपीडी) केंद्राचे उद्घाटन आमदार महेश लांडगे व अनाथाची माता सिंधूताई सपकाळ यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी घरकुल फेडरेशनच्या वतीने सपकाळ यांच्या संमतीने बालनिकेतन 50 हजार रूपये मदत करण्यात आली. तसेच उपस्थितांची देखील सढळ हाताने रोख स्वरूपात मदत केली. यावेळी व्यासपीठावर पालिकेचे प्रशासकीय अधिकारी गजानन येळमेळे, प्रमाणित लेखापरीक्षक शरद गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे, नगरसेवक कैलास कदम, शिक्षणमंडळाचे चेतन घुले, पालिकेचे अधिकारी राहुल पाटील, आप्पा सायकर, शरद गायकवाड फेडरेशनचे मुख्य प्रवर्तक अशोक मगर आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
सिंधूताई म्हणाल्या की, अनेक यातना भोगून जिद्द, कष्ट व तूमच्या सारख्याच्या प्रेमामुळे जगाचा संसार आज करत आहे. अनेक अनाथ मुलांची माता झाले. तुम्हाला स्वतःचे घर मिळाले आहे. आलेल्या संकटाना घाबरू नका. जिद्दीने पुढे जा ज्याच्यात बळ, ताकद, पैसा नाही, अशा नागरिकांना घर मिळाले की किती आनंद होतो यांची मला जाणीव आहे. आज थोडा त्रास असेलही परंतू लक्षात ठेवा परिस्थिती बदलते, आत्मीयता व प्रेमाने माणसे जिंका नीटनेटका संसार करा. घरात कुरबुर, भांडणे झालीच तर एकाने गप्प बसा. तसेच मुलींनी ध्येय निर्माण करा. तुमच्या आई-वडिलांनी यातना भोगल्या त्या तुम्ही भविष्यात भोगू नका. अभ्यास करा. आयुष्याकडे उघड्या डोळ्याने बघा. जमाना बदलतोय, तुम्ही बदलू नका. प्रत्येक जण काही तरी करू शकतो फक्त हिम्मत ठेवा.
आमदार महेश लांडगे म्हणाले, सिंधू ताई सपकाळ यांचे काम मला व समाजाला प्रेरणा देणारे आहे. घरकुलवसीनी एकत्रित येवून फेडरेशनची स्थापना केली ही आनंदाची बाब आहे. संघटनेच्या माध्यमातून विकास करा. वज्रमुठीच्या माध्यमातून काम करा. घरकुलवासीयांसाठी फेडरेशन जेव्हा जेव्हा न्याय हक्कासाठी भांडेल त्या वेळी जे काही शक्य असेल ती मदत केली जाईल.
विश्वास कदम यांनी प्रास्ताविक केले. दत्ता करपे यांनी सूत्रसंचालन केले. सुरेश मांडूर यांनी आभार मानले. फेडरेशनचे मुख्य प्रवर्तक अशोक मगर, प्रतिनिधी सुधाकर धुरी, अजय जाधव, अशोक कुर्हाडे, आबासाहेब गवळी, युवराज निलवर्ण, अरविंद सिलम आदीनी संयोजन केले.
सिंधूताई सपकाळ यांच्या हस्ते पालिका आरोग्य केंद्राचे उद्घाटन
